वणीचा शिक्षण विभाग झाला पोरका
By Admin | Updated: July 1, 2017 01:10 IST2017-07-01T01:10:32+5:302017-07-01T01:10:32+5:30
येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन विस्तार अधिकारी शुक्रवारी ३० जुनला सेवानिवृत्त झाले.

वणीचा शिक्षण विभाग झाला पोरका
केंद्रप्रमुखावर डोलारा : तालुक्यातील १५० शाळा वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन विस्तार अधिकारी शुक्रवारी ३० जुनला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता शिक्षण विभागाला कोणीही वाली उरला नाही. त्यामुळे तालुक्यातील १५० शाळा व हजारो विद्यार्थी वाऱ्यावर सोडले गेले आहेत.
येथील शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पद कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. कधी विस्तार अधिकारी, तर कधी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रभार सोपवून गाडा ओढला जात आहे. मागील दोन वर्षांपासून तीन विस्तार अधिकारीच येथे कार्यरत आहे. त्यातील प्रकाश नगराळे यांचे काही दिवसांपूर्वीच झरी पंचायत समितीमध्ये स्थानांतर झाले. पांढरकवडा येथून पदस्थापनेवर आलेले सहाय्यक गटविकास अधिकारी इंगोले यांच्याकडे गटशिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार होता. चार महिन्यांपूर्वी ते पांढरकवडा येथे आपल्या मुळ पदावर गेले. मात्र तेसुद्धा शुक्रवारी सेवानिवृत्त झाले.
शिक्षण विभागाचा संपूर्ण भार मेश्राम व सोयाम या दोन विस्तार अधिकाऱ्यांवर होता. शाळा सुरू झाल्यानंतर पाठ्यपुस्तकांचे वाटप, शाळांमधील विद्यार्थी प्रवेशांच्या अडचणी, शिक्षकांची बदली, ही कामे दारावरच असताना हे दोन्ही विस्तार अधिकारी ३० जुनला सेवानिवृत्त झाले. आता शिक्षक विभागाला काही विस्तार अधिकारी नाही. केवळ केंद्रप्रमुख व गटसंसाधन केंद्रातील कंत्राटी साधन व्यक्ती विषयतज्ञ यांच्यावरच शिक्षण विभागाचा डोलारा उभा आहे.
झरी येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वणीचा प्रभार देण्यात आल्याचे समजते. झरी ते वणी हे अंतर ४० किलोमीटर आहे. रस्ताही आडवळणाचा आहे. तेव्हा झरीचे हे अधिकारी वणीचा कारभार कसा सांभाळतात, हे न समजण्यासारखे आहे. तालुक्यात १३ केंद्र आहेत. केंद्रप्रमुखांची संख्याही मागील चार वर्षांपासून पुरेशी नाही. केवळ सहाच केंद्रप्रमुख काम सांभाळत आहेत. केंद्र प्रमुखांकडे दोन-तीन केंद्राचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अखत्यारितीतील सर्व शाळांकडे लक्ष ठेवणे अशक्य होत आहे. केवळ माहितीच्या देवाणघेवाणीतच केंद्रप्रमुखांची शक्ती खर्च होत आहे. आता जुलै महिन्यात शाळांची पटसंख्या भरणे, संचमान्यता करणे, शिष्यवृत्तीची कामे आटोपणे, ही महत्त्वाची कामे सुरू होणार आहे. यांपैकी बरीचशी कामे आॅनलाईन करावी लागते.
त्यासाठी केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर बरीचशी माहिती भरावी लागते. आता ही महत्त्वाची कामे कशी पार पाडली जाणार, याकडे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे लक्ष लागले आहेत.