शंभर गावांचे आगामी सरपंच थेट जनतेतून
By Admin | Updated: July 5, 2017 00:08 IST2017-07-05T00:08:41+5:302017-07-05T00:08:41+5:30
जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ दरम्यान होणार आहे.

शंभर गावांचे आगामी सरपंच थेट जनतेतून
२८६ ठिकाणी निवडणूक : प्रभाग रचना जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील २८६ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ दरम्यान होणार आहे. त्यापैकी १०० गावांमध्ये नवीन नियमानुसार थेट जनतेतून सरपंच निवडले जाणार आहे.
पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींची निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जाते. विविध पक्ष आणि संघटना ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतात. जिल्ह्यात २८६ पैकी १०० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. उर्वरित १८६ गावांमध्ये पोटनिवडणूक होणार आहेत. त्या दृष्टीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यात प्रभाग रचना, प्रारूप व आरक्षण तयार करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या प्रारूपावर येत्या ११ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. ११ जुलैनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्याची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. २५ जुलैला प्रारूपाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. त्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध होऊन प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
गावपुढाऱ्यांमध्ये चुरस
नवीन कायद्यानुसार थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या १०० गावांमधील गावपुढाऱ्यांमध्ये प्रचंड चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांमध्ये आतापासूनच वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. मात्र सातवीपेक्षा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना निवडणुकीला मुकावे लागणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील २८६ ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होणार आहे.