अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत
By Admin | Updated: October 5, 2014 23:14 IST2014-10-05T23:14:14+5:302014-10-05T23:14:14+5:30
खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे.

अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत
महागाव : खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे. कृषी विभागाने या प्रकरणी कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली. मात्र त्यांनी केराची टोपली दाखविली. तसेच कृषी विभागाच्यावतीने आयोजित ग्रामसभा, मेळावेही कागदोपत्रीच दिसत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. पावसाच्या प्रतीक्षेत बी-बियाण्यांची खरेदी लांबली. पाऊस आला तेव्हा बियाण्यांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. यात महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याचे पुढे येत आहे. अनेकांनी पेरलेले सोयाबीन उगविलेच नाही. तर काही ठिकाणी शेंगाच लागल्या नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. परंतु त्यांनीही केवळ बोळवणच केली आहे.
कृषी केंद्रांवर पंचायत समितीचा कृषी विभाग मेहरनजर असल्याचे दिसत आहे. अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असताना कृषी केंद्र चालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कृषी केंद्राच्या तपासण्याच होत नसल्याने अप्रमाणित बियाणे विक्रीला उधाण आले होते. कृषी केंद्र संचालकांनी सारे नियम पायदळी तुडविले. कृषी केंद्रात दर्शनी भागावर भाव फलक, उपलब्ध खत, औषधी साठा, मुदत संपलेली औषधी, बियाणे प्रमाणित असल्याबाबत पुरावे आदी अपवादानेच पहायला मिळतात. पाच कृषी केंद्रातून विकलेले बियाणे अप्रमाणित निघाले. या पाचही कृषी केंद्र संचालकांना कृषी विभागाने १७ सप्टेंबर रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली. परंतु पंधरवाडा उलटला तरी या नोटीसला उत्तर दिले नाही.
महागाव तालुक्यात सातत्याने बनावट बियाणे विकले जात असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तालुक्यात ७२ कृषी केंद्र कार्यरत असून महागाव आणि मुडाणा येथील घाऊक दुकानातून तालुक्यातील इतर कृषी केंद्रांना मालाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांची फसवणूक होऊनही कृषी केंद्रांवर ठोस कारवाई केली जात नाही. तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील सोयाबीन विविध रोगाला बळी पडले आहे. काही ठिकाणी बनावट बियाणे निघाले आहे. मात्र कृषी अधिकारी कार्यालय आणि शेतकरी यांच्यात समन्वय दिसत नाही. कृषी विभागाने शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेतल्याचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात सरपंचानाही या मेळाव्याची माहिती दिसत नाही. एकंदरित कृषी विभागाच्या या धोरणाचे शेतकरी मात्र बळी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)