ट्रकचालकाला मदत करणे भोवले; गुंगीचे औषध फवारून १६ लाखांचा मुद्देमाल लुटला
By सुरेंद्र राऊत | Updated: September 20, 2022 16:12 IST2022-09-20T16:11:31+5:302022-09-20T16:12:08+5:30
ट्रकमध्ये बसताच त्यांनी गुंगीचा स्प्रे वापरून देवानंद सोनोने यांना बेशुद्ध केले.

ट्रकचालकाला मदत करणे भोवले; गुंगीचे औषध फवारून १६ लाखांचा मुद्देमाल लुटला
यवतमाळ : अकोला येथून अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकचालकाला दोन प्रवाशांची मदत करणे चांगलेच भोवले. संशयितांनी अमरावतीला जायचे असे सांगून ट्रकमध्ये प्रवेश केला. चालकाच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून त्याला बेशुद्ध केले. नंतर त्या दोघांनी ट्रक नेर मार्गावरील लासीना येथे आणला. ट्रकमधील १५ लाख ९९ हजारांचा माल व इतर साहित्य काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरले व पोबारा केला. ही घटना १४ सप्टेंबरच्या पहाटे २.३० वाजेदरम्यान घडली.
मुंबई येथील बिपीन रोड लाइन्सचा ट्रक घेऊन चालक देवानंद काशीनाथ सोनोने हे अकोला येथून अमरावतीकडे जात होते. ट्रकमध्ये सिगारेट, चॉकलेट, माचीस, अगरबत्ती तसेच साबण हे साहित्य होते. जवळपास १५ लाख ९९ हजार १८० रुपयांचा माल होता. ट्रकचालक अमरावतीला जात असताना दोघांनी त्याला रस्त्यात हात दिला. आम्हाला अमरावतीला सोडून द्या अशी विनवणी त्या दोघांनी केली.
ट्रकमध्ये बसताच त्यांनी गुंगीचा स्प्रे वापरून देवानंद सोनोने यांना बेशुद्ध केले. नंतर हा ट्रक अमरावती मार्गावरील लासीना येथे आणला. ट्रकमधील सर्व साहित्य काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरले. चालकाच्या खिशातील दोन मोबाइल व रोख चार हजार रुपयेही काढून घेतले. यानंतर चोरटे पळून गेले. या घटनेची माहिती ट्रकचालकाने मालक जंगबहाद्दूर पाल यांना दिली. याप्रकरणी लाडखेड पोलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.
वाटमारीच्या घटना वाढल्या
ट्रकमधील १६ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या तक्रारीचा पोलीस दोन्ही दिशेने तपास करत आहे. अशा घटनांमध्ये विमा मिळविण्यासाठीसु्द्धा बनाव केल्याचे पुढे येते. ही शक्यता तपासली जात आहे. बरेचदा चालकाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.