पाचही सभापतींची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:19 IST2018-01-09T21:18:33+5:302018-01-09T21:19:03+5:30
नगरपरिषदेत काही दिवसांपासून शहरी विरुद्ध वाढीव क्षेत्र असा संघर्ष होता.

पाचही सभापतींची अविरोध निवड
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : नगरपरिषदेत काही दिवसांपासून शहरी विरुद्ध वाढीव क्षेत्र असा संघर्ष होता. त्याचे पडसाद विषय समिती सभापती निवडताना दिसून आले. यातून बांधकाम व आरोग्य या महत्त्वपूर्ण समित्या वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांकडे सोपविल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या निवड प्रक्रियेत पाचही समिती सभापती व स्थायी समिती सदस्यांची अविरोध निवड झाली.
बांधकाम सभापतिपदी भोसाचे नगरसेवक प्रवीण प्रजापती, आरोग्य सभापतिपदी उमरसरा येथील दिनेश चिंडाले, शिक्षण समिती सभापतिपदी लोहारा येथील नीता भास्कर केळापुरे, नियोजन व विकास समिती सभापतिपदी भानुदास राजने, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी नंदा संजय जिरापुरे यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदी सुजाता कांबळे यांची निवड झाली.
स्थायी समिती सदस्य म्हणून भाजपाकडून स्वीकृत सदस्य अजय राऊत, नगरसेवक जगदीश वाधवाणी यांची, तर काँग्रेसकडून वैशाली प्रवीण सवाई यांची निवड करण्यात आली. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे उपस्थित होते. नगराध्यक्ष कांचन चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय उपस्थित होते. सत्ताधारी भाजपातील सदस्यांमध्ये शहरीविरुद्ध वाढीव क्षेत्र, असा वाद सुरू होता. यामुळे भाजपा नेत्यांनी वाद कमी करण्यासाठी समिती सभापतिपदासाठी वाढीव क्षेत्राला झुकते माप दिल्याचे दिसून येते. शहरातून केवळ नंदा जिरापुरे यांना प्रतिनिधित्व मिळाले.
निवड प्रक्रिया अविरोध होणार, हे दुपारीच स्पष्ट झाले होते. समिती सदस्य ठरल्यानंतर सभापतिपदासाठी नावे सुचविण्यात आली. प्रत्येक समितीसाठी एकच नाव आल्याने प्रक्रिया अविरोध पार पडली.
आता आरोग्य सभापतींची लागणार कसोटी
वाढीव कर आकारणीविरोधात नगरसेवक दिनेश चिंडाले यांनी अनेक वर्षांपासून सभागृहात स्पष्ट भूमिका घेतली होती. अलिकडे त्यांच्याच नेतृत्वात आंदोलनही उभे राहिले. परंतु आता आरोग्य सभापती पदाची माळ गळ्यात पडल्याने चिंडाले वाढीव कराच्या मुद्यावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. चिंडाले यांच्या विरोधाची धार बोथट करण्यासाठी तर त्यांना सभापतीपद देण्याची खेळी पक्षाकडून खेळली गेली नाही ना, असा सूरही ऐकायला येतोय.
असे आहेत सभापती
प्रवीण प्रजापती - बांधकाम
दिनेश चिंडाले - आरोग्य
नीता केळापुरे - शिक्षण
भानुदास राजने - नियोजन
नंदा जिरापुरे - बालकल्याण
उपाध्यक्ष कायम
यवतमाळ नगरपरिषदेचे उपाध्यक्षही बदलणार अशी राजकीय गोटात चर्चा होती. भाजपाकडून त्यादृष्टीने चाचपणीही केली गेली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने उपाध्यक्षपद व त्यांच्याकडील खाते कायम राहिले.