उमरखेड, महागावला अखेर ३२ शिक्षक मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:03 IST2019-07-21T22:03:25+5:302019-07-21T22:03:59+5:30
गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे.

उमरखेड, महागावला अखेर ३२ शिक्षक मिळाले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या वर्षभरापासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे गाजत असलेल्या उमरखेड, महागाव तालुक्यातील शाळांना ३२ शिक्षक मिळाले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेने तातडीचे समूपदेशन घेऊन या शिक्षकांना बदली दिली. सोमवारी त्यांना प्रत्यक्ष आदेश मिळणार आहे.
या दोन्ही पंचायत समितीमध्ये शिक्षकांची कमतरता ऐरणीवर आली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इतर तालुक्यातील शिक्षकांना इच्छा असल्यास उमरखेड, महागावमध्ये जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेत इच्छुकांनी विकल्प अर्ज भरले. लगेच त्यांचे समूपदेशनही झाले. त्यानंतर ३२ शिक्षकांना उमरखेड, महागावमधील पसंतीच्या जिल्हा परिषद शाळेत बदली देण्यात आली आहे. यात उमरखेड पंचायत समितीमध्ये १५ तर महागावमध्ये १७ शिक्षकांना पाठविण्यात येणार आहे. तर एका शिक्षकाने ही प्रतिनियुक्ती नाकारली. प्रत्यक्ष बदली आदेश सोमवारी शिक्षकांच्या हाती पडणार आहे. या तातडीच्या प्रक्रियेमुळे किमान ३२ शाळांना तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र शेकडो शाळांची प्रतीक्षा कायम आहे.
कार्यरत शिक्षकांना पदोन्नती देण्याचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. मात्र आधी रिक्त जागा भराव्या आणि त्यानंतर शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी भूमिका जवळपास सर्वच संघटनांनी घेतली आहे. त्याला प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ३२ शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीनेही हा प्रश्न पूर्णपणे सुटण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जाते.