मिरवणुकीवरील दगडफेकीत दोन पोलीस जखमी
By Admin | Updated: August 31, 2014 00:06 IST2014-08-31T00:06:08+5:302014-08-31T00:06:08+5:30
विद्युत पुरवठा खंडित झाल्याची संधी साधत काही लोकांनी गणपती मिरवणुकीवर दगडफेक केली. लाकडी फळीने मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. बंदोबस्तातील दोन पोलीस शिपाई दगडफेकीत जखमी झाले.

मिरवणुकीवरील दगडफेकीत दोन पोलीस जखमी
उमरखेड शहरातील घटना : मूर्तीची विटंबना, पोलीस अधीक्षक घटनास्थळी, गुन्हे दाखल
उमरखेड : विद्युत पुरवठा खंडित झाल्याची संधी साधत काही लोकांनी गणपती मिरवणुकीवर दगडफेक केली. लाकडी फळीने मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. बंदोबस्तातील दोन पोलीस शिपाई दगडफेकीत जखमी झाले. प्रकरणी परस्परांविरुध्द दाखल तक्रारीवरून दोनही गटांतील काही लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
स्थानिक शिवाजी वार्डातील मित्र गणेश मंडळाचा गणपती स्थापनेसाठी शुक्रवारी आठवडीबाजारातून जात होता. रात्री १० च्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. अंधाराचा फायदा घेत दगडफेक करून लाकडी फळीने गणेश मूर्तीची विटंबना केली. या आशयाची तक्रार अक्षय रमेश कोंडुलकर यांनी दिली.
यानुसार इनायतुल्ला जनाब, समंदर लाला, मुकद्दर लाला, शरीक लाला, सिकंदर लाला, शहजाद लाला, कलीम उल्हा, लाला सर, फिरोज पठाण, बबलू पानठेलेवाला, गुड्डु पठाण, अक्रम खान, फरहान यांच्यासह ४५ ते ५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच शहजाद खान, समंदर खान (रा. रोहिलापुरा) यांच्या तक्रारीवरून अविनाश ठाकूर, विक्की सोनार यांच्यासह ५० ते ७० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
झालेल्या दगडफेकीत गजानन राठोड आणि दिगंबर मुसळे हे पोलीस शिपाई जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विटंबना झालेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.
सदर घटनेमुळे शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी विविध भागात चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान सदर घटनेप्रकरणी काही लोकांवर भादंवि १४७, १४८, १४२, २९५, ३३६, ३२३, ३२४ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील जखमी शिपायांवर उपचार सुरू असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)