यवतमाळ जिल्ह्यात टिप्पर-मिनीडोअरच्या धडकेत दोन ठार, पाच गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 13:56 IST2018-03-29T13:56:44+5:302018-03-29T13:56:44+5:30
भरधाव टिप्परने मिनीडोअरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात राळेगाव तालुक्यातील कोसारा गावाजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडला.

यवतमाळ जिल्ह्यात टिप्पर-मिनीडोअरच्या धडकेत दोन ठार, पाच गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव टिप्परने मिनीडोअरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात राळेगाव तालुक्यातील कोसारा गावाजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडला. अपघात एवढा भीषण होता की एकाच शिर टिप्परच्या चाकाखाली चिरडल्या गेले तर दुसऱ्याचे शिर धडापासून वेगळे झाले होते. अपघातस्थळावरील दृश्य अतिशय भीषण होते.
भोपीदास रामदास राठोड (३५), कैलास बद्दू राठोड (३४) दोघेही रा. मीरा (जिरा) ता.पांढरकवडा अशी मृतांची नावे आहे. तर विलास बद्दू राठोड (४०), रमेश बळीराम राठोड (४५), पवन रमेश राठोड (१८), मिनीडोअर चालक कैलास भामराज राठोड (३२), विजय सदाशिव जाधव (२५) अशी जखमींची नावे आहेत. पांढरकवडा तालुक्यातील जिरा (मीरा) येथील ही मंडळी शेळ्या विकण्यासाठी टेंभुर्डा येथील जनावरांच्या बाजारात जात होते. मिनीडोअरमध्ये ३० शेळ्या होत्या. त्यामुळे काहीजण मिनीडोअरच्या कॅबीनवर बसलेले होते. कोसारा गावाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने (क्र.एम.एच.३४/एबी-४६१०) मिनीडोअरला जबर धडक दिली. त्यामुळे कॅबीनवर बसून असलेले दोघेजण समोरच्या बाजूला तर दोघे मागच्या बाजूला कोसळले. समोरील बाजूला कोसळलेल्या दोघांच्याही डोक्यावरून टिप्परचे चाक गेले. त्यामुळे भोपीदास राठोडचे डोके चिरडल्या गेले. तर कैलासचे शिर धडापासून वेगळे झाले. या अपघाताची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उमरी येथील रुग्णालयात दाखल केले.
घटनास्थळावर भीषण दृश्य पाहून अनेकांना भोवळ आली. रक्तमांसाचा सडा आणि धडापासून वेगळे झालेले शिर पाहून प्रत्येकजण हळहळत होता. भोपीदासच्या मागे पत्नी, दोन मुले तर कैलासच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहे. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.