घाटंजीतील दोन ज्वेलर्स फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:56 IST2018-12-21T23:55:53+5:302018-12-21T23:56:59+5:30
शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली.

घाटंजीतील दोन ज्वेलर्स फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : शहरात चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. गुरूवारी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी हात साफ केले. मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकान फोडले, एक दुचाकीही लंपास केली.
१९ डिसेंबरच्या रात्रीपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. स्थानिक पोलिसांचे कोणतेच नियंत्रण दिसत नाही. बुधवारी रात्री ईस्तारीनगर येथील अनंत राऊत यांचे घरफोडून १९ हजाराचे दागिने चोरून नेले. त्यानंतर २० डिसेंबरच्या रात्री गणेश कवडू राठोड यांची एमएच २९- बीसी-३१७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. येथून चोरट्यांनी बाजारपेठेतील हर्षे यांचे ज्वेलर्सचे दुकान फोडून एक लाख ५९ हजाराचे दागिने व रोख १० हजार रूपये असा एक लाख ६९ हजाराचा मुद्देमाल चोरी गेला. येथून चोरट्यांनी बाजुच्याच शुभम ज्वेलर्सकडे मोर्चा वळविला, दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र दागिने ठेवून असलेली तिजोरी न उघडल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. चोरट्यांनी दुकाने फोडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येणार नाही याची पूर्ण दक्षता घेतल्याचे दिसून येते. त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. केवळ एका ठिकाणी चोरटे दुचाकीवरून येताना दिसतात. चोरट्यांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आले नाही. एलसीबीचे प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार असलम खान यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पोपुलवार तपास करत आहे.