-निचलसिंह गौर, यवतमाळधुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. डोंगरखर्डा (यवतमाळ) येथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर आठ जण गेले होते. त्यातील पाच जण अचानक बुडायला लागले. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले, तर दोन मावस भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (१४ मार्च) धुळवड खेळून अंघोळीसाठी दुपारी धरणात उतरले असता ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अंधार झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले.
पंकज अशोकराव झाडे (वय ३५, रा. झाडगाव, राळेगाव), जयंत पंढरी धानफुले (वय २८, रा. मार्डी, ता.मारेगाव) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले होते.
आठ जण पाण्यात उतरले अन्...
धुळवड झाल्यानंतर अंघोळ करण्याकरिता अरुण भोयर, पंकज झाडे, जयंत धानफुले व आणखी पाच जण धरणात पोहण्यासाठी गेले होते. सगळे पाण्यात उतरले. पण अचानक पाच जण गंटागळ्या खाऊ लागले.
बोटीच्या साहाय्याने तिघांना वाचवले
मासे पकडण्याकरिताची धरणावरील बोट व साधने नीट आहेत का, हे बघण्यासाठी देवानंद नागपुरे, श्रीराम डायरे, अविनाश वाडेकर, शंकर नागपुरे हे देखील धरणा लगत होते. तरुण बुडत असल्याचे पाहून देवानंद नागपुरे, श्रीराम डायरे, अविनाश वाडेकर व शंकर नागपुरे लगेच मासे पकडण्यासाठी ठेवलेल्या बोटीच्या साहाय्याने जाऊन तिघांना वाचविले. शोध मोहिमेदरम्यान, पंकज झाडे याचा मृतदेह मिळाला. जयंत धानफुले यांचा मृतेदह मिलाला नाही.
घटनेची माहिती मिळताच कळंब ठाणेदार राजेश राठोड घटनास्थळी पोहोचले होते. दुपारी 12 वाजता पासूनपर्यंत शोध कार्य सुरु होते. एक मृतदेह कळंब येथे शवविच्छेदना करिता पाठवला आहे.
पुन्हा शोध कार्य सुरू केले जाणार
शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले जाणार घेतला जाणार आहे. पंकजचे लग्न झाले असून, त्याच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.
पंकज हा राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील रहिवासी होता. तर जयंत धानफुले हा मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील रहिवासी आहे. दोघेही मावसभाऊ होते. त्यांच्या जाण्याने झाडे व धानफुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
शोध कार्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मोवाडे, जामदार गजानन धात्रक, प्रदीप चव्हाण, रवी आत्राम, बाजीराव ससाने उपस्थित होते. शनिवारी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने शोध घेऊन जयंत चा शोध घेतला जाईल, असे ठाणेदार राजेश चव्हाण यांनी सांगितले.