खुन केल्यानंतर हातबांधून पैनगंगा नदीत फेकला मृतदेह; सख्खा भाऊ, भाचाच निघाला मारेकरी
By सुरेंद्र राऊत | Updated: November 2, 2025 17:50 IST2025-11-02T17:50:00+5:302025-11-02T17:50:34+5:30
पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या.

खुन केल्यानंतर हातबांधून पैनगंगा नदीत फेकला मृतदेह; सख्खा भाऊ, भाचाच निघाला मारेकरी
उमरखेड (यवतमाळ) : तालुक्यातील तिवडी येथे पैनगंगा नदीच्या पात्रात १५ ऑक्टोंबर राेजी हात बांधलेला मृतदेह आढळून आला. शवचिकित्सा अहवालातून त्या व्यक्तीची गळादाबून हत्या केल्याचे पुढे आले. एलसीबी पथकाने मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले. ताे मृतदेह नांदेड जिल्ह्यातील कळगाव येथील असल्याचा शाेध लागला. त्यावरून आराेपीही कुटूंबातीलच असल्याचे उघड झाले. सख्खा भाऊ व भाच्याने ही हत्या केल्याचे उघड झाले. त्या दाेघांनाही अटक करून उमरखेड पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मारोती गुणाजी सोनकर (५०)रा. कळगाव ता. उमरी जि. नांदेड असे मृताचे नाव आहे. ताे १ नाेव्हेबर पासून बेपत्ता हाेता. यवतमाळ एलसीबी पथक अनाेळखी व्यक्तीचा शाेध घेत असताना त्यांना ही माहिती मिळाली. उमरी पाेलिस ठाण्यात दाखल बेपत्ता तक्रारीची पडताळणी केली, त्यानंतर सिसिटीव्ही फुटेज तपासले असता तिवडी (उमरखेड) येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली.
त्यानंतर तपास पथकाने मृतकाच्या कुटुंबातील सदस्यांना विचारपूस केली. यातून हत्येचा उलगडा झाला. सुरूवातीला संशयीत म्हणून मृताचा भाऊ गणेश सोनकर आणि भाचा अमोल श्रीमंगले यांना ताब्यात घेवून चाैकशी सुरू केली. दाेघांनी गुन्ह्याची कबूल दिली. माराेती हा नेहमीच घरातील सदस्यांना त्रास देत होता आणि त्याच्यामुळे सर्व कुटुंब मानसिकदृष्ट्या तणावात असल्याचे आराेपींनी सांगितले. ही कारवाई पाेलिस अधीक्षक कुमार चिंता,अपर अधिक्षक अशोक थोरात, एसडीपीओ हनुमंत गायकवाड, एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धिरज बांडे, उपनिरीक्षक शरद लाेहकरे, मुन्ना आडे, संताेष भाेरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठाेड, सुनिल पंडागळे, रविंद्र श्रीरामे, राजेश जाधव यांनी केली.
दारू पाजून १४ ऑक्टाेबर राेजी केली हत्या
माराेतीचा काटा काढण्यासाठी आराेपींनी १४ ऑक्टोंबर रोजी त्याला दारुच्या नशेत असताना दुचाकीवरून एका निर्जन स्थळी आणले. तेथे त्याचा गळा दाबून आणि डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून त्याची हत्या केली. नंतर, मृतकाचे हात बांधून, त्याला पैनगंगा नदीत फेकल्याची कबूली आराेपींनी दिली. त्यावरून उमरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. यात गणेश गुणाजी सोनकर (३१) रा. कळगांव, अमोल किसनराव श्रीमंगले (२५) रा. कोळगांव यांना अटक केली आहे.