पांढरकवडा ‘पीओ’साठी दोन एसीएफमध्ये रस्सीखेच
By Admin | Updated: July 1, 2014 01:42 IST2014-07-01T01:42:17+5:302014-07-01T01:42:17+5:30
आदिवासी खात्याच्या पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी पदी वर्णी लागावी म्हणून दोन सहायक वनसंरक्षकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

पांढरकवडा ‘पीओ’साठी दोन एसीएफमध्ये रस्सीखेच
वरकमाईवर डोळा : वर्षभरापासून पद रिक्त
यवतमाळ : आदिवासी खात्याच्या पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी पदी वर्णी लागावी म्हणून दोन सहायक वनसंरक्षकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
पांढरकवडा प्रकल्प अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाल्यापासून ही जागा रिक्त आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी अपर जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी या श्रेणीतील अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. परंतु रॉयल्टीची व्याप्ती पाहून या अधिकाऱ्यांनी नाद सोडला. आता सहायक वनसंरक्षक दर्जाचे दोन अधिकारी या स्पर्धेत आहेत. काहीही करून पांढरकवड्याचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बनायचेच असा चंग या अधिकाऱ्यांनी बांधला आहे. सुमारे दीडशे कोटी रुपयांचे जुने बजेट या प्रकल्पाचे आहे. त्यावर डोळा ठेऊनच वरकमाईसाठी या अधिकाऱ्यांनी फिल्डींग लावली आहे. यातील एक अधिकारी सध्या कोकणात नियुक्तीला आहे. ‘मी आमदाराचा जावई’ असे सांगणाऱ्या या सहायक वनसंरक्षकापुढे एका नव्यानेच पदोन्नत झालेल्या एसीएफचे आव्हान आहे. आरएफओ असलेल्या या अधिकाऱ्याला एसीएफ म्हणून बढतीवर महिनाभरापूर्वी पश्चिम विदर्भातच पाठविले गेले होते. परंतु हा अधिकारी तेथे रुजू न होता पांढरकवडा प्रकल्पासाठी मुंबईत तळ ठोकून असल्याचे बोलले जाते. त्यांचा स्पर्धक एसीएफही मुंबईतच ठाण मांडून आहे. त्यात आता नेमके कुणाला यश येते हे पाहणे महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)