भाड्याच्या वास्तूत आदिवासी वसतिगृहे

By Admin | Updated: November 8, 2015 02:23 IST2015-11-08T02:23:52+5:302015-11-08T02:23:52+5:30

तालुकास्थळीसुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची एकही ईमारत नसल्याने विद्यार्थ्यांना...

Tribal hostels in rental architecture | भाड्याच्या वास्तूत आदिवासी वसतिगृहे

भाड्याच्या वास्तूत आदिवासी वसतिगृहे

विद्यार्थ्यांची कुचंबणा : शासकीय इमारतीची प्रतीक्षाच, किमान दोन वास्तूंची गरज
वणी : तालुकास्थळीसुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची एकही ईमारत नसल्याने विद्यार्थ्यांना भाड्याच्या ईमारतीतच कोंडवाड्याप्रमाणे गुजराण करून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबना होत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होणार ?, याचे उत्तर शासनाजवळही उरले नाही.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना इतर उन्नत समाजाबरोबर आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. भारतीय राज्यघटनेतसुद्धा मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद केली गेली आहे. वणी तालुक्यात १४ टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे. मात्र या प्रवर्गातील बहुतांश नागरिक अजूनही अज्ञान व गरिबीच्या छाताखालीच गुजराण करीत आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण संस्थेत शिकविण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे सुज्ञ पालक स्वत: शिकले नसले, तरी आपला पाल्य शिकून मोठा व्हावा, त्याच्या कमाईने कुटुंबाचे दारिद्र्य दूर व्हावे, अशी आशा धरून आहे.
आदिवासी बांधव आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी शहरातील शाळा, कॉलेजात दाखल करतात. त्यांच्या निवासाची सोय म्हणून शासनाच्या वसतिगृहाकडे पाहिले जाते. दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासाची व्यवस्थाही असावी, अशी त्यांची ईच्छा असते. मात्र वणीमध्ये अशी दर्जेदार व्यवस्था नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्नच आता भंगण्याची वेळ आली आहे.
शहरात कधीकाळी दूरसंचार कार्यालयाजवळ शासकीय वसतिगृहाची ईमारत होती. मात्र गेल्या काही वर्षापूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने आदिवासी विभागाने वसतिगृहाचा डेरा भाड्याच्या ईमारतीत हलविला. आता या ईमारतीची दारे, खिडक्या व साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. ईमारतीच्या चारही बाजूंनी अतिक्रमणाने विळखा घातला आहे. आदिवासी विभागाने वणीत वसतिगृहाच्या बांधकामाचा विचार का केला नाही, हे समजायला मार्ग नाही. येथे वसतिगृहाच्या ईमारतीसाठी आवश्यक असणारी मोठी शासकीय जागा उपलब्ध आहे. तरीही वसतिगृहाच्या ईमारतीसाठी येथील लोकप्रतिनिधीही प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते.
शहरात भाड्याच्या ईमारती घेऊन वेळोवेळी वसतिगृहाचा डेरा इकडून-तिकडे हलविला जात आहे. दोन-तीन ठिकाणच्या ईमारती भाड्याने घेऊन तेथे एका खोलीत अनेक विद्यार्थ्यांना राहण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार, असा प्रश्न आहे. सतत गोंगाट सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. भाड्याच्या वास्तूत पुरेशी स्वच्छता गृहे, भोजन कक्ष, वाचन कक्ष, क्रीडा मैदान यांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना स्वयंपाकगृहातून जेवणाचे डब्बे नेऊन खोलीतच भोजन करावे लागते. वास्तूत वाचनालय नसल्याने अवांतर वाचन करून सामान्य ज्ञान मिळविण्याचा मार्गच बंद झाला. मग आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये तगणार कसे ? त्यामुळे नोकऱ्यांमधील आदिवासींसाठी राखीव असलेल्या अनेक जागा अजूनही रिकाम्या आहेत. शहरात शासकीय वसतिगृहाची प्रशस्त ईमारत नसल्याने आदिवासी पालक विद्यार्थ्यांना वसतिगृहात टाकण्याचा दहादा विचार करतात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना मधूनच शिक्षण सोडून पोटापाण्याला लावले जाते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Tribal hostels in rental architecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.