वाहतूक पोलिसांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:32 IST2018-07-14T22:32:17+5:302018-07-14T22:32:44+5:30
पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती.

वाहतूक पोलिसांचा मदतीचा हात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पतीच्या निधनानंतर मोलमजुरी करून दोन मुलांना घडविणाऱ्या मातेच्या एकाकी संघर्षाची वाहतूक पोलिसांनी दखल घेत तिला मदतीचा हात दिला. सकाळी धुणी-भांडी करून दुपारनंतर नारळ पाणी विकण्याचा व्यवसाय ती करत होती. ही बाब वाहतूक पोलिसांना समजताच त्यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
लोहारा येथील लता भिसे ही महिला पतीच्या निधनानंतर खंबीरपणे आपल्या मुलांना शिकविण्यासाठी धडपडत आहे. महागाईच्या काळात दिवसरात्र राबून पोटापुरतेही शिल्लक पडत नाही. त्यात मुलगी प्रीती बारावीला तर, मुलगा प्रेम दहाविला आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च लताबाईला झेपत नव्हता. तरी कष्ट सुरूच होते. हातगाडीवरून नारळपाणी विक्रीचा व्यवसाय ती करते. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांना तिच्या संघर्षाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ समाजसेवक योगेश पाटील आणि बालाजी ठाकरे यांच्या सहकार्याने या कुटुंबाला मदतीचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च देण्याचा संकल्प केला. वाहतूक शाखा कार्यालयात या मुलांना गणवेश व शालेय साहित्य देण्यात आले. ट्युशन फिसह सर्वच खर्च देण्याचा संकल्प केला. यावेळी वाहतूक शाखेतील प्रदीप तांबेकर, सुरेंद्र वासनिक, यशपाल बैस, सुरेश मोहोड आदी उपस्थित होते.