Transfer to the traffic branch | वाहतूक शाखेत बदलीसत्राने शुकशुकाट

वाहतूक शाखेत बदलीसत्राने शुकशुकाट

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्था कोलमडली : कोट्यवधींचा महसूल देणारी वणीची शाखा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : चार वर्षात एक कोटी ४४ लाख ९५ हजाराचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करणारी वणीची वाहतूक शाखा बदलीसत्रात अक्षरश: रिकामी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे तैनात असलेल्या वाहतूक निरीक्षकासह दोन जमादार, दोन शिपाई व दोन महिला पोलीस शिपाई यांच्या शिरावर शहराच्या वाहतुकीची जबाबदारी येऊन पडली आहे.
वणी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पाच वर्षांपूर्वी वणीत वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी या शाखेत २६ शिपाई, तीन महिला शिपाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक एवढा ताफा तैनात होता. त्यामुळे शहराच्या वाहतुकीला एक शिस्त लागली होती. या शाखेने शहरातील दोन मार्गांवर एकेरी वाहतूक सुरू करून शहरातील वाहतुकीला दिशा दिली होती. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन दंडाच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळत होता. सन २०१५ मध्ये २० लाख ५५ हजार ९०० रूपये, २०१६ मध्ये ३२ लाख दोन हजार ४०० रूपये, २०१७ मध्ये ३४ लाख १६ हजार ९०० रूपये, तर २०१८ मध्ये ४२ लाख ७४ हजार ६०० रूपये वार्षिक महसूल वणी वाहतूक शाखेने दंडाच्या माध्यमातून गोळा केला.
जानेवारी ते जुलैर्पंत या शाखेने पाच हजार ८०९ केसेस करून १५ लाख ४५ हजार ८०० रूपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला. आतापर्यंत या विभागाने एक कोटी ४४ लाख ९५ हजार ६०० रूपये दंडाच्या माध्यमातून महसूल गोळा केला आहे. वणी शहरात वाहतूक शाखा निर्माण झाल्यापासून एकही अपघात घडला नाही. सोबतच नागरिक व बच्चे कंपनींना एकप्रकारची शिस्त लागली. मात्र एक महिन्यापासून या वाहतूक शाखेला ग्रहण लागले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बदलीसत्र सुरू झाले. त्यात २४ पोलीस शिपाई, जमादारांची बदली जिल्हास्तरावर करण्यात आल्याने संपूर्ण वाहतूक शाखा रिकामी झाली आहे. सध्या या शाखेत दोन जमादार, दोन शिपाई व दोन महिला शिपाई कार्यरत आहे. त्यांपैकी एक महिला शिपाई प्रसुती रजेवर, तर दोन पोलीस शिपायांना यवतमाळ येथे परेडसाठी पाठविण्यात आले आहे. परिणामी सध्यातरी वाहतूक शाखेत शुकशुकाट दिसून येत आहे.
शहरात वाहनांची संख्या मोठी असून खाती चौक ते अणे चौक हा एकेरी मार्ग रस्त्याच्या कामामुळे बंद आहे. त्यामुळे टिळक चौक ते सर्वोदय चौकापर्यंतची वाहतूक व्यवस्था जटील झाली आहे. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे आॅटो स्थानिक टिळक चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक या परिसरात रस्त्याच्या कडेला ठाण मांंडून बसत असून त्यांच्यावर कुणाचाही अंकुश उरला नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बदली सत्रामध्ये वणी वाहतूक शाखेतील पोलीस बळ कमी झाले आहे. शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी अतिरीक्त पोलीस दलाची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. ती लवकरच पूर्ण होणार आहे.
- नंदकुमार आयरे,
वाहतूक शाखा प्रमुख वणी

Web Title: Transfer to the traffic branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.