ट्रामा केअर मंजुरीवरच थांबले
By Admin | Updated: January 28, 2015 23:42 IST2015-01-28T23:42:49+5:302015-01-28T23:42:49+5:30
गेल्या वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या येथील ग्रामीण रूग्णालयातील ‘ट्रामा केअर’ युनिटचे काम केवळ मंजुरीवर थांबले आहे. आत्तापर्यंत केवळ जागा निश्चितीच्या पुढे हे युनिट सरकलेच नाही.

ट्रामा केअर मंजुरीवरच थांबले
वणी : गेल्या वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या येथील ग्रामीण रूग्णालयातील ‘ट्रामा केअर’ युनिटचे काम केवळ मंजुरीवर थांबले आहे. आत्तापर्यंत केवळ जागा निश्चितीच्या पुढे हे युनिट सरकलेच नाही. त्यामुळे हे युनिट प्रत्यक्षात कधी साकारणार, हा प्रश्न कायमच आहे.
वणी उपविभागात यापूर्वी वणीसह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यांचा समावेश होता. उपविभाग पुनर्रचनेत झरीजामणी तालुका पांढरकवडा उपविभागाला जोडण्यात आला. वणी, मारेगाव आणि झरीजामणी या तीनही तालुक्यात ग्रामीण रूग्णालय आहे. मारेगाव आणि झरीपेक्षा वणी तालुका आणि वणी शहर कितीतरी पटीने मोठे आहे. मात्र येथे केवळ ३0 खाटांचेच ग्रामीण रूग्णालय अस्तित्वात आहे.
वणी शहर आणि तालुक्याच्या मानाने येथील ग्रामीण रूग्णालयातील ३0 खाटा आता अत्यंत तोकड्या पडत आहे. त्यामुळे सातत्याने येथे उपजिल्हा रूग्णालयाची मागणी होत आहे. तथापि उपजिल्हा रूग्णालय तर सोडाच या ग्रामीण रूग्णालयातील खाटाही अद्याप वाढल्या नाही. वर्षभरापूर्वी २0 खाटा वाढल्याची ‘आवई’ उठविण्यात आली होती. मात्र नंतर ही आवईच असल्याचे आता स्पष्ट होत आहे.
वणी तालुक्यात कोळसा उद्योगाने ठाण मांडले आहे. जवळपास १५ कोळसा खाणींतून तालुक्यात कोळसा काढला जातो. हा कोळसा खाणींपासून रेल्वे सायडींग व कोल डेपोपर्यंत वाहून नेण्यासाठी विविध वाहनांचा वापर केला जातो. परिणामी या तालुक्यात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. शेकडो वाहने तालुक्यात दररोज धावत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र अपघातग्रस्तांना वणीत कोणत्याच सुविधा मिळत नाही. अपघातातील जखमींना थेट चंद्रपूर अथवा नागपूर येथे ‘रेफर’ करावे लागत आहे.
अपघातग्रस्तांवर उपचाराची योग्य सुविधा नसल्यानेच वर्षभरापूर्वी येथे ‘ट्रामा केअर युनिट’ मंजूर करण्यात आले. तत्कालीन आमदारांनी त्यासाठी भरीव प्रयत्न केले. त्यामुळे हे युनिट मंजूर झाले. मात्र आता हे युनिट केवळ मंजुरीवरच थाबंल्याचे दिसत आहे. वर्षभरापासून हे युनिट जागेवरच आहे. सुरूवातीला केवळ जागा पाहणी करण्यात आली. नंतर ग्रामीण रूग्णालयातीलच एक जागा युनिटसाठी निश्चित करण्यात आली. तेथून पुढे हे युनिट रखडले.
या युनिटसाठी ग्रामीण रूगणालयातील एक जागा निश्चित झाल्याची माहिती ग्रामीण रूगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रशेखर खांबे यांनी दिली. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या चमूने जागेची पाहणी करून ती जागा निश्चित केली. मात्र या युनिटसाठी अद्याप निधीच प्राप्त झाला नसल्याची माहिती हाती आली आहे. परिणामी निधीअभावी आता हे युनिट मंजुरीवरच थांबले आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे.
वणी ते करंजी, वणी ते वरोरा-चंद्रपूर आणि वणी ते घुग्गुस-चंद्रपूर हे मार्ग अत्यंत वर्दळीचे आहेत. या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. त्यात कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असते. अवजड वाहतुकीने हे रस्तेही आधीच बाधीत झाले आहेत. त्यातूनच अपाघातांची संख्या वाढत असल्याने वणीत ट्रामा केअर युनिट मंजूर झाले आहे. अपघातग्रस्तांना योग्य आणि ताडतीने उपचार मिळण्यासाठी हे युनिट अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मात्र मंजुरीपलिकडे हालचाल होत नसल्याने हे युनिट अद्याप स्वप्नच ठरले आहे.
तालुक्यात शिरपूर, कायर, कोलगाव, राजूर येथे चार प्राथमिक आरोग्य केंदे्र असून त्याअंतर्गत २६ उपकेंद्रे आहेत. ही केंद्रे आणि उपकेंद्रे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आता तोकडी ठरत आहेत. दुसरीकडे ट्रामा केअर युनिट रखडले आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना दिलासा मिळणे कठीण झाले आहे. अपघातातील जखमींना त्यामुळे प्राण गमवावे लागण्याची शक्यता बळावली आहे. हे युनिट होईपर्यंत किमान वणीत उपजिल्हा रूग्णालय होण्याची आवश्यकता आहे. तेवढेही होत नसेल, तर लोकप्रतिनिधींनी ग्रामीण रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नवीन आमदारांकडून तालुक्यातील जनतेला तशी अपेक्षा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)