रेतीच्या ट्रकातून सागवान तस्करी

By Admin | Updated: June 28, 2014 23:48 IST2014-06-28T23:48:52+5:302014-06-28T23:48:52+5:30

महागाव तालुक्यातील शिरपुली रेतीघाट रेती वाहतूक करणाऱ्या काही ट्रक चालकांसाठी वरदान ठरला आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी असल्याने रेती वाहतूक करणाऱ्या काही ट्रक

Traffic from the sands truck | रेतीच्या ट्रकातून सागवान तस्करी

रेतीच्या ट्रकातून सागवान तस्करी

देवानंद पुजारी - फुलसावंगी
महागाव तालुक्यातील शिरपुली रेतीघाट रेती वाहतूक करणाऱ्या काही ट्रक चालकांसाठी वरदान ठरला आहे. वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी असल्याने रेती वाहतूक करणाऱ्या काही ट्रक चालकांनी सागवान तस्करीची अभिनव शक्कल लढवून शिरपुली जंगलातील ४० ते ५० झाडांची कत्तल केली आहे. कत्तल केलेला कटसाईज सागवान रेतीच्या ट्रकमध्ये टाकून सुरक्षितरीत्या पुसदपर्यंत नेण्याचा सपाटा सुरू आहे. याबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ आहेत.
रेतीच्या ट्रकातून आतापर्यंत चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचे सागवान लंपास केले आहे. सध्या फुलसावंगी परिसरातील शिरपुली, शिहूर, हिंगणी, बोरगाव या रेतीघाटातून दररोज मोठ्या प्रमाणात पुसद येथे ट्रकद्वारा रेतीची वाहतूक होत आहे. दररोज किमान ५० ते ६० ट्रक रेतीची वाहतूक फुलसावंगी मार्गे पुसदकडे होते. रेती घाटाचा लिलाव होताना जिल्हाधिकारी कार्यालयातून कंत्राटदारांना रेती वाहतुकीचे नियम व अटी पाळण्याचे बंधन केल्या जाते. ट्रकमधून रेतीची वाहतूक करताना रेती पूर्णपणे झाकून नेणे, सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करणे बंधनकारक आहे. परंतु महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधामुळे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी सर्व नियम ढाब्यावर बसवून रात्री-बेरात्रीसुद्धा रेतीची वाहतूक करणे सुरू ठेवले आहे.
अशाच प्रकारे रात्री होणाऱ्या रेती वाहकीतून काही ट्रक चालकांची शिरपुली जंगलातून सागवान उपश्यांवर करडी नजर ठेवली आहे. रात्रीच्यावेळी ट्रकमधून सागवान वृक्षाची कत्तल करून रेतीखाली त्याची सुरक्षित तस्करी केली जाते. फुलसावंगी वर्तुळांतर्गत शिरपुली बिटमधील वटमदरा व खिनाडी या जंगलांतील ४० ते ५० सागवान झाडांची कटाई करण्यात आली आहे. कंपार्टमेंट नं. ४८०, वटमदरा या जंगलामध्ये प्रस्तूत प्रतिनिधीने प्रत्यक्ष फेरफेटका मारून पाहणी केली असता आतापर्यंत वटमदरा जंगलात २२ सागवान झाडांची कत्तल केल्याचे आढळले आहे. तर बहुतांश कटसाईझ माल जंगलातील नाल्यामध्ये पालापाचोळा टाकलेल्या अवस्थेत आढळून आला. तोडलेल्या थुटाचे मोजमाप केले असून एकूण ४.५५८ घनमीटर सागवान लंपास झाले असून एक लाख १३ हजार ५० रुपयांचे सागवान केवळ वटमदरा जंगलातून चोरीला गेले आहे. तर कंपार्टमेंट नं. ४८१ खिनाडी या जंगलातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात सागवान लंपास झाले आहे.
हा प्रकार कित्येक दिवसांपासून सुरू आहे. वन संरक्षणासाठी तालुक्यात वन परिक्षेत्राधिकारी, वनपाल, वनरक्षकासह फिरत्या वनपथकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु वनविभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे या सर्व यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून जंगलातून नियोजनबद्धपणे मोठ्या प्रमाणात सागवानाची तस्करी होत आहे.

Web Title: Traffic from the sands truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.