जिल्ह्यात प्रथमच शौचालय सप्ताह
By Admin | Updated: November 11, 2014 22:47 IST2014-11-11T22:47:45+5:302014-11-11T22:47:45+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय सप्ताह राबविल्या जाणार आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक विभाग प्रमुखांकडे

जिल्ह्यात प्रथमच शौचालय सप्ताह
यवतमाळ : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शौचालय सप्ताह राबविल्या जाणार आहे. यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक विभाग प्रमुखांकडे गावांची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
शाळा तसेच गाव पातळीवर आणि प्रत्येक कार्यालयात हा कार्यक्रम राबवायचा आहे. जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, गाव आणि कार्यालय यांची यादी संकलित करून प्रत्येक अधिकाऱ्याकडे स्वतंत्र जबाबदारी दिली जात आहे. कार्यवाही नियंत्रक आणि सहाय्यक नियंत्रण अधिकारी हे या सप्ताहाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. यात एक ते दहा पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करावयाचा आहे. १४ नोव्हेंबर रोजी शाळा परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबरला व्यक्तिगत स्वच्छतेचे महत्व सांगून हात धुणे, नखे काढणे, दातांची स्वच्छता, कपड्यांची स्वच्छता याची माहिती दिली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात शाळेचा परिसर, शौचालय, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, अवती-भोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याची भांडी स्वच्छ ठेवणे याची माहिती कार्यशाळेतून दिली जाणार आहे. चौथ्या टप्प्यात घराची, परिसराची, गावातील मंदिराची, शरीराची स्वच्छता कशी राखावी याचे महत्व सांगण्यात येणार आहे. पाचव्या टप्प्यात मुतारी, शौचालय, स्वच्छतागृह याचे महत्व सांगून त्यापासून रोगराईमुक्त कसे राहता येईल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. शेवटी स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वर्गखोली सजावट स्पर्धा घेतली जाणार आहे.
या सप्ताहामध्ये गावातील स्थानिक स्वराज्य संस्था, बचतगट, भजनी मंडळ, क्रीडा मंडळे, प्रतिष्ठीत नागरिक यांचा सहभाग घेऊन कृती समिती निर्माण केली जाणार आहे. त्यानंतर गावात स्वच्छता आराखडा तयार करून घरापासून संपूर्ण ग्राम स्वच्छता, पाणी, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत याची स्वच्छता, धार्मिक स्थळे, समाज मंदिर, खेळाचे मैदान, बाजार परिसर, सार्वजनिक शौचालय, सांडपाण्याच्या नाल्या, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, मोठ्या नाल्यांची सफाई करणे यासाठी गावात आठवड्यातून किमान एक दिवस निश्चित करून सर्वांनी श्रमदान करणे, घाणीमुळे पसरणाऱ्या आजारांबाबत माहिती देणे, याचप्रमाणे शासकीय कार्यालयस्तरावरही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्रकल्प अधिकारी, सर्व नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बालक दिनापासून हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)