चरख्यावर सूत कातून आजही ते वापरतात खादीचेच वस्त्र

By Admin | Updated: October 2, 2015 06:57 IST2015-10-02T06:57:55+5:302015-10-02T06:57:55+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुस्तकात आले, चलनी नोटांवर आले, आंदोलनांच्या बॅनरवर आले, शासकीय कार्यालयांच्या भिंतींवर आले,

Today, it is used as khadi only | चरख्यावर सूत कातून आजही ते वापरतात खादीचेच वस्त्र

चरख्यावर सूत कातून आजही ते वापरतात खादीचेच वस्त्र

ज्ञानेश्वर मुंदे ल्ल यवतमाळ
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुस्तकात आले, चलनी नोटांवर आले, आंदोलनांच्या बॅनरवर आले, शासकीय कार्यालयांच्या भिंतींवर आले, कोट्यवधी लोकांच्या ओठांवरही आले, इतकेच काय, कित्येकांच्या मनातही शिरले... पण गांधीजींचे विचार किती जणांच्या वर्तनात उरतले? आज फॅशनच्या जमान्यात किती जणांना स्वातंत्र्य चळवळीतील खादीच्या वस्त्रांची आठवण आहे? नाही ना? पण आर्णी तालुक्यातील लोणीचा नंदापुरे परिवार अजूनही गांधीजींच्या खादीवर प्रेम करतो. हा परिवार खादीचेच कपडे वापरतो आणि तेही स्वत: कातलेल्या सुताचे!
गांधीजींचा विचार श्वासाप्रमाणे जपणारा लोणी येथील नंदापुरे परिवार उच्च शिक्षित आहे. दत्तात्रेय तुकाराम उपाख्य द.तु. नंदापुरे गुरूजी यांनी संस्कृत विषयात एम.ए. केले. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३५ साली जन्म झालेल्या गुरूजींच्या जीवनावर ‘चले जाव’ चळवळीचा पगडा आहे. गुरुजी १९४२ मध्ये पहिल्या वर्गात असताना गांधी-नेहरू शब्द कानी पडायचे. त्यावेळी प्रगल्भता नसली तरी आपसूकच त्यांच्या मनावर त्याचा प्रभाव पडला. त्यातच लोणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ऐकलेले कीर्तन त्यांच्या जीवनाला दिशा देऊन गेले.
‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ या विचाराने आजही ते जीवन जगत आहेत. तेच नाही तर त्यांचा संपूर्ण परिवार आज गांधी विचाराने भारावलेला आहे. स्वदेशीचा पुरस्कारच नाही तर या परिवाराने अंगीकार केला आहे. दररोज सूत कताई करणे हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अंबर चरखा आणि येरवाडा चरख्यावर दररोज सूत कातले जाते. नंदापुरे गुरूजी, त्यांची कन्या अपर्णा नंदापुरे, मुलगा जयंत दररोज चरख्यावर कताई करतात. कताईसाठी लागणारे रुईचे पेळू वर्धा येथील ग्रामसेवा मंडळातून विकत आणतात. घरी कातलेल्या पेळूपासून तयार झालेले सूत याच मंडळाच्या विणाई विभागाला देतात. वस्त्र स्वावलंबन योजनेंतर्गत तेथील विणकर या परिवाराला सुतापासून हातमागावरील कापड नि:शुल्क तयार करून देतात. रंगाईसाठी केवळ आठ ते नऊ रुपये मीटर पैसे द्यावे लागते.
वर्षभरात सहा किलो पेळूपासून तयार झालेल्या सुतात संपूर्ण कुटुंबाचे कपडेच नाही तर चादरी, बेडशीट आणि इतर कपडेही तयार होत असल्याचे अपर्णा नंदापुरे यांनी सांगितले. एक किलो पेळूपासून आठ ते नऊ मीटर कापड तयार होतो. अस्सल खादीचे आणि स्वत:च्या हाताने कातलेल्या सुताचे कपडे आम्ही व्रत म्हणूनच घालतोय. हे कापड आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. खादीचे कपडे हिवाळ््यात गरम आणि उन्ह्याळ््यात थंड असतात. एवढेच नाही तर अनेक विणकरांच्या हातालाही काम मिळते असे अपर्णा नंदापुरे सांगते.
आज अनेक जण फॅशन म्हणून खादी वापरतात. दुकानातून महागडी खादी विकत आणतात. परंतु या परिवारासाठी गांधी विचार आणि स्वकष्टातून तयार झालेली खादी श्वास आहे. घरातील इतर वस्तुही स्वदेशीच असाव्यात, असा त्यांचा कटाक्ष असतो. नंदापुरे गुरुजींचा मुलगा जयंतने कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली न करता तो आपली शेती नैसर्गिक पद्धतीने कसतो. घरातील वस्तुही त्यांच्या विचारांना बळ देणाऱ्याच आहेत.

गुरूजींनी लिहिली गांधी जीवनावर बोधगीता
साक्षात साने गुरूजींचा अनुभव यावा, असे व्यक्तिमत्व असलेले द.तु. नंदापुरे व्यासंगी लेखक आहेत. भगवत्गीता आणि तुलसीरामायण हे त्यांचे आवडते गं्रथ आहेत. भगवत्गीतेवर त्यांनी सुगीता हा मराठी अनुवाद ग्रंथ लिहिला आहे. तर तुलसीरामायणाचा मराठी ओवीबद्ध अनुवाद ते सध्या करीत आहेत. महात्मा गांधींच्या जीवनावर बोधगीता हे काव्य त्यांनी लिहिले आहे. आज ८० वर्षांचे असलेले गुरूजी दररोज तासभर सूत कताई आणि नित्यनेमाने लेखन करतात.

Web Title: Today, it is used as khadi only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.