थकीत कर्जासाठी चौघांचा नेरमध्ये शेतकऱ्यावर हल्ला
By Admin | Updated: February 28, 2016 02:27 IST2016-02-28T02:27:20+5:302016-02-28T02:27:20+5:30
खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले.

थकीत कर्जासाठी चौघांचा नेरमध्ये शेतकऱ्यावर हल्ला
महिंद्रा फायनान्स कंपनी : वसुली करणाऱ्या चौघांचे कृत्य
नेर : खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. या कंपनीच्या चार प्रतिनिधींनी शेतकऱ्याला शनिवारी दुपारी गंभीर मारहाण केली.
तालुक्यातील टाकळी (सलामी) येथील शेतकरी दिनेश हिम्मतराव चौधरी (३६) यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांनी यवतमाळ येथील महिंद्रा फायनान्सकडून १ लाख १० हजार रुपये कर्ज घेतले होते. कंपनीने त्यापैकी केवळ ७५ हजार रुपयेच दिले. मात्र कर्जाचा भरणा सुरू करण्यास बजावले. सदर शेतकऱ्याने आधी उर्वरित ३५ हजार रुपये द्या, अशी मागणी केली. परंतु उर्वरित रक्कम काही शेतकऱ्याला मिळाली नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी दिनेश चौधरी यांना फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने एका कार्यालयात बोलाविले. तिकडे जात असताना आजंती रोडवरील एका पुलाजवळ त्यांना थांबवून चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेतकरी तेथेच बेशुद्ध पडला. नेर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करून शेतकऱ्याला यवतमाळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सदर शेतकऱ्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात संपूर्ण घटनाक्रम सांगितला. वृत्त लिहेपर्यंत या घटनेबाबत गुन्हा नोंद झालेला नव्हता.
सध्या खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहे. हा प्रकार न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी गोपाल चव्हाण यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)