हुर्रे! पर्यटकांसाठी टिपेश्वर अभयारण्याचे दार उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:17 IST2021-10-26T13:28:33+5:302021-10-26T16:17:42+5:30
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, १९ ऑक्टोबर रोजी टिपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असून, पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे.

हुर्रे! पर्यटकांसाठी टिपेश्वर अभयारण्याचे दार उघडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे अभयारण्यातील पायवाटा पुसल्या जातात, तसेच गाड्या चिखलात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. मात्र, आता पर्यटकांसाठी टिपेश्वर अभयारण्याची दारे उघडली आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती. मात्र, हे अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी फुलले असून येथील व्याघ्र दर्शन हे त्यांचे मुख्य आकर्षण आहे. या अभयारण्यात वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे. टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी वाढल्याने पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता, पांढरकवडा वन विभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर रोजी टिपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असून, पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे.
हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये हे अभयारण्य व्यापलेले आहे. उंच डोंगराळ व दऱ्या-खोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात. तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर ई. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात. टिपेश्वर अभयारण्यात सफर करण्याकरिता पर्यटकांना ऑनलाइन बुकिंग करता येईल.