वृक्ष लागवडीचे तीनतेरा

By Admin | Updated: August 26, 2014 23:45 IST2014-08-26T23:45:53+5:302014-08-26T23:45:53+5:30

पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते.

Three years of tree plantation | वृक्ष लागवडीचे तीनतेरा

वृक्ष लागवडीचे तीनतेरा

नांदेपेरा : पावसाळा सुरू झाला की दरवर्षी शासनातर्फे गावागावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मात्र अनेक ठिकाणी झाडे लावल्यानंतर ती आठ-पंधरा दिवसांतच मरून जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वृक्ष लागवड मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत.
वृक्ष लागवडीवर शासन दरवर्षी लाखो रूपये खर्च करीत असते़ मोठ्या थाटामाटात गावोगावी वृक्ष लागवड केली जाते. मात्र नंतर लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल कुणीही करीत नाही़ परिणामी पावसाळा संपताच झाडे पूर्णत: नष्ट होतात़ तरीही पुन्हा दरवर्षी झाडे लावण्याची मोहीम राबविली जाते़ परंतु एकही झाड जिवंत राहत नसल्याने वृक्ष लागवड मोहिमेचा सर्वत्र फज्जा उडाला आहे़
या वृक्ष लावगडीसाठी अनेक गावी नर्सरी स्थापन केली जाते. त्यात रोपटी लावली जातात. त्यातूनच ग्रामपंचायती, संस्थांना रोपटी पुरविली जातात. मात्र अनेक नर्सरीमध्ये ही रोपटी जागीच वाळून जातात. काही नर्सरींमध्ये तर रोपट्यांचीच झाडे होतात. तरीही कुणीच ती रोपटी वृक्ष लावगडीसाठी नेत नाहीत. तालुक्यात अनेक ठिकाणी असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. संबंधित नर्सरीमध्येच रोपट्यांचे झाडांत रुपांतर झाले आहे. तथापि नर्सरी चालकांवर अद्याप कुठेही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
दरवर्षी गावोगावी झाडे लावली जातात. मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे आता शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला झाडे देताना त्या झाडांची जोपासणे करणे, ती जिवंत ठेवण्याबाबत उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना झाडे जीवंत ठेवण्याची जबाबदारी सोपविल्यासच, झाडे जिवंत राहू शकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा निधीही पाण्यात जाणार नाही. गावही हिरवेगार होईल. पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल. त्याचा सर्वांनाच लाभ होईल. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Three years of tree plantation