तीन वर्षात राज्यातील चार कोटींची वीज चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:32 IST2018-08-22T15:28:04+5:302018-08-22T15:32:31+5:30
गेल्या तीन वर्षात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने राज्याच्या विविध भागात धाड टाकून तब्बल चार कोटींची वीज चोरी उघडकीस आणली.

तीन वर्षात राज्यातील चार कोटींची वीज चोरी उघडकीस
रवींद्र चांदेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या तीन वर्षात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने राज्याच्या विविध भागात धाड टाकून तब्बल चार कोटींची वीज चोरी उघडकीस आणली. यात माहिती देणाऱ्यांना ४१ लाखांचे बक्षीस देण्यात आले.
वीज गळती आणि चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणतर्फे कसोशीने प्रयत्न सुरू आहे. वीज चोरीविरुद्ध वारंवार मोहीम राबविली जात आहे. मात्र वीज चोरटे नवीन युक्त्या वापरून वीज चोरी करीतच आहे. ही वीज चोरी उघडकीस आणणे महावितरणच्या अवाक्या बाहेर गेले आहे. त्यामुळे महावितरणने अशा वीज चोरीची माहिती दिल्यास संबंधितांना वीज चोरीच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली होती. त्यावरून राज्याच्या विविध भागात महावितरणच्या भरारी पथकाने धाडी टाकून गेल्या तीन वर्षात चार कोटी १० लाखांची वीज चोरी उघडकीस आणली.
२०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षात मिळालेल्या माहितीवरून महावितरणच्या भरारी पथकांनी राज्यातील ३६ ठिकाणी धाडी टाकल्या. त्यातून चार कोटी १० लाखांची वीज चोरी उघडकीस आली. संबंधितांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. या रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणून वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाख रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या या सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.
गळती, चोरी सुरूच
महावितरणतर्फे गळती आणि चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना अनेक भागात अद्यापही वीज गळती आणि चोरीचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे महावितरणने आता जादा गळती आणि चोरी असलेल्या भागात एरिअल बंच केबल टाकण्याचा निर्णयही घेतला आहे. अमरावतीसह काही ठिकाणी अशी केबल टाकण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी वीज चोरी असलेल्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी देण्याचे निर्देश दिले आहे.