पोहा मिलसह जिल्ह्यात तीन ठिकाणी आग
By Admin | Updated: June 6, 2017 01:22 IST2017-06-06T01:22:35+5:302017-06-06T01:22:35+5:30
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याची घटना सोमवारी घडली.

पोहा मिलसह जिल्ह्यात तीन ठिकाणी आग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याची घटना सोमवारी घडली. दिग्रस येथे वैरणाचा ट्रक, उमरखेडच्या सिंदगी येथे गोठ्याला आग तर आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील पोहा मील जळून खाक झाला.
उमरखेड तालुक्यातील सिंदगीशिवारात विनायक तानाजी सुरोशे यांचा गोठा आहे. सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटने गोठ्याला आग लागली. या आगीत रासायनिक व मिश्र खताच्या ४० बॅग, सोयाबीनच्या पाच बॅग, ११ क्ंिवटल शिजविलेली हळद, सात क्ंिवटल बेण्याची हळद यासह शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील पोहा मिलला आग लागली. या आगीत २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतुल कोमावार यांच्या मालकीच्या या पोहा मिलला रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. ही माहिती आर्णी येथे राहणारे मील मालक अतुल कोमावार यांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु आग विझविण्यासाठी पाण्याचा तुटवडा असल्याने या आगीत मिल जळाली. वृत्तलिहिस्तोवर आग धुमसत होती. तर दिग्रस येथील चिरडे मंगल कार्यालयासमोर वैरण घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. या आगीत संपूर्ण वैरण जळून भस्मसात झाले. अग्नीशमनदलाने आगीवर नियंत्रण मिळविले.