कोरोनाच्या मृत्यूसत्रात २७ वर्षीय तरुणीसह आणखी तिघांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:13+5:30
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात २६८ जणांवर उपचार सुरू आहे.

कोरोनाच्या मृत्यूसत्रात २७ वर्षीय तरुणीसह आणखी तिघांचे बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात अक्षरश: मृत्यूसत्र सुरू असून मंगळवारी आणखी तीन बळी गेले. विशेष म्हणजे यात यवतमाळ शहरातील केवळ २७ वर्षीय तरुणीचाही समावेश आहे. तसेच उमरखेडमधील ५० वर्षीय पुरुष आणि कळंबमधील ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गंभीर म्हणजे गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल २२८ कोरोना बळी गेले.
मंगळवारी दिवसभरात जिल्ह्याच्या विविध भागात ९४ नवे रुग्ण आढळून आले. त्यात ६२ पुरुषांसह ३२ महिला आहे. त्यापैकी यवतमाळ शहरात २० पुरुष, तीन महिला, तालुक्यात दोन पुरुष व एक महिला, दारव्हामध्ये १७, घाटंजीमध्ये १६, आर्णीत सात, दिग्रस तीन, महागाव एक, मारेगाव पाच, नेर एक, पांढरकवडा पाच, पुसद दोन, राळेगाव तीन, उमरखेड एक, वणी सहा तसेच मानोरा येथील एका पुरुषाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला.
जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत एकंदर सात हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सहा हजार २५ नागरिकांनी कोरोनाला हरवून रुग्णालयातून सुटी मिळविली. सध्या ५४७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ७३३ जणांना ठेवण्यात आले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात २६८ जणांवर उपचार सुरू आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत एकंदर ६८ हजार ८५५ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील ६७ हजार ३३५ नमुन्यांचे अहवाल आले असून ५९ हजार ९५२ निगेटिव्ह आहेत. मात्र १५२० स्वॅब नमुन्यांचे अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला अद्याप प्राप्त व्हायचे आहे. जिल्ह्यात दररोज रुग्ण वाढत असल्याने यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.