तीन अपघातात २ ठार, १६ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:53 IST2017-08-13T22:52:58+5:302017-08-13T22:53:22+5:30
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर १६ जण गंभीर जखमी झाले.

तीन अपघातात २ ठार, १६ गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर १६ जण गंभीर जखमी झाले. मजुरांना घेऊन जाणारा आॅटोरिक्षा देवधरी घाटात उभ्या ट्रकवर आदळून १४ जण जखमी झाले. यवतमाळ शहरानजीकच्या मडकोना परिसरात दुचाकी अपघातात सफाई कर्मचारी तर पुसद तालुक्यातील भोजला येथे मोटरसायकल झाडावर आदळून एक जण ठार आणि दोन जण गंभीर जखमी झाले.
पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथून मजुरांना घेऊन आॅटोरिक्षा चाचोरा येथील शेताकडे रविवारी सकाळी जात होता. राष्टÑीय महामार्ग क्र. ७ वरील देवधरी घाटात उभ्या असलेल्या एका नादुरुस्त ट्रकवर हा आॅटोरिक्षा आदळला. अपघात एवढा भीषण होता की, आॅटोरिक्षाने दोन-तीन पलट्या मारल्या. त्यामुळे आॅटोरिक्षातील १४ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यात सुरेश आडे (३५), सकुबाई चव्हाण (५१), कैलास मडावी (६५), रेणुका प्रकाश कन्नाके (४५), कल्पना विजय मडावी (३५), धु्रपदाबाई महादेव कोवे (६०), लिलाबाई राठोड (६०), रेणुका राठोड (३५), कविता चव्हाण (३५), तानेबाई विलास वडे (४०), कल्पना किशोर मोरेवार (३०), रेखा राठोड (३५), रशिदा रऊफ शेख (५०), उद्धव राठोड (६५) यांचा समावेश आहे. जखमींना प्रथम करंजी व नंतर यवतमाळ व सावंगी मेघे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. वीज वितरण कंपनीच्या अधिवेशनाला जाणाºया कर्मचाºयांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
यवतमाळ-नागपूर मार्गावरील मडकोना घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन सफाई कर्मचारी ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. उमेश रामचरण तुरतेले (३२) रा. गोधनी रोड, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. तो येथील अमोलकचंद महाविद्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. सकाळी यवतमाळवरून हिंगणघाटकडे दुचाकीने जात होता. मडकोना घाटात नियंत्रण सुटल्याने पायी येत असलेल्या विठ्ठल लक्ष्मण राऊत (५९) याला दुचाकीची धडक देऊन तो रस्त्यावर आदळला. त्यात गंभीर जखमी होऊन उमेशचा जागीच मृत्यू झाला. जखमीला यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिसरा अपघात पुसद तालुक्यातील भोजला शिवारात घडला. भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने भगवान नामदेव कांबळे (२७) रा. भोजला हा जागीच ठार झाला. तर सचिन संजय खंदारे (२४), संतोष नारायण गायकवाड (३०) हे गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे तिघे पिंपळगावकडे जात होते. एका वळणावर दुचाकी झाडावर आदळल्याने अपघात झाला. जखमींना पुसद रुग्णालयात दाखल केले.