तीन कंपन्यांनी ‘आधार’ सोडला
By Admin | Updated: November 8, 2014 22:44 IST2014-11-08T22:44:43+5:302014-11-08T22:44:43+5:30
जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत.

तीन कंपन्यांनी ‘आधार’ सोडला
नोंदणी संथगतीने : दोन हजार गावांसाठी ५७ केंद्र
यवतमाळ : जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत. त्यामुळे अवघ्या वर्षभरात नोंदणीची मोहीम पूर्ण करण्याचे शासनाचे आश्वासन हवेत विरले आहे.
जिल्ह्यातील २७ लाख ७२ हजार ३४८ नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी पात्र आहेत. मात्र नोंदणीसाठी यंत्रणाच नसल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आधारकार्ड काढण्याची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविण्यात आली होती. यामध्ये वक्रांगी, नेटलिंक आणि फिनोटेक या कंपन्यांचा समावेश होता. या तीनही कंपन्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता नोंदणीचे काम बंद केले. १३ जानेवारी २०१४ पासून या कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाशी कुठलाही संपर्क साधला नाही.
या कंपनीच्या कामकाजाचा अहवाल जिल्हा प्रशासनाने वरिष्ठांकडे पाठविला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आधारकार्ड नोंदणीची संपूर्ण जबाबदारी सीएमएस कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीच्या मदतीने ई-महासेवाकेंद्र चालविले जातात. या ई-महासेवा केंद्रांकडे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ८० केंद्राकडे हे काम सोपविण्यात आले. यातील ५७ केंद्रांवर सध्याच्यास्थितीत आधारकार्ड काढले जातात. दोन हजार ४० महसुली गावांसाठी ५७ आधारकार्ड केंद्र अपुरे आहे. त्यामुळे या केंद्रावर एकच गर्दी उडत आहे तर, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना या केंद्राची माहितीच नाही.
यवतमाळ तालुक्यात ८ केंद्र, आर्णी तालुक्यात ७ केंद्र, घाटंजी, राळेगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यात प्रत्येकी १ केंद्र सुरू करण्यात आले आहे. पुसद तालुक्यात १२, महागाव तालुक्यात ३, उमरखेड तालुक्यात ८ आणि केळापूर तालुक्यात ५ केंद्र उघडण्यात आले आहेत. मारेगाव तालुक्यात २ तर वणी तालुक्यात ६ केंद्र उघडण्यात आले आहे. (शहर वार्ताहर)