सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार
By Admin | Updated: November 15, 2014 02:11 IST2014-11-15T02:11:19+5:302014-11-15T02:11:19+5:30
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे.

सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार
नेर : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक सोयाबीनने दगा दिला आहे. पिकच न झाल्यामुळे पुढील वर्षी खरिपात सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई भासणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी जादा दाम मोजावे लागण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. कधी अती पाऊस तर कधी परतीचा पाऊस आणि गारपीट आणि कधी अत्यल्प पाऊस अशा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकांना बसत असून याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर होत आहे. यावर्षी खंडित पावसामुळे दीड ते दोन महिने उशिरा झालेली पेरणी. त्यानंतर दुबार व तिबार पेरणीचे संकट आणि पावसाने मारलेली दडी यामुळे सोयाबीनची उगवण अत्यल्प झाली. बाधित बियाण्याच्या पेरणीमुळे यावर्षी सोयाबीनवर पिवळा (मोझॅक) रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे ७० टक्के सोयाबीन करपले, शेंगा पोचट राहिल्या, एकरी एक पोत्याची झडती सध्या होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षापेक्षाही यावर्षीचे सोयाबीन खराब झाल्यामुळे ते पुढच्या वर्षीच्या पेरणीयोग्य नाही. परिणामी २०१५ मध्ये खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची तीव्र टंचाई राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या सोयाबीन कापणीचा व मळणीचा हंगाम सुरू आहे. यापूर्वी सोयाबीनवर झालेल्या मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकूण लागवणीपैकी सोयाबीनचे ७० टक्के क्षेत्र करपले आहे. शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने त्या मोठ्या प्रमाणात पोचट राहिल्या. व दाणेही बारिक झाले. यामुळे मळणीमध्ये एकरी एक किंवा दोन पोते सोयाबीन झडत आहे. एकरी १५ हजार रुपये खर्च सोयाबीनला येत असताना उत्पन्न मात्र केवळ अडीच ते तीन हजार रुपये मिळत असेल तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सद्यस्थितीत २० टक्के संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ८० टक्के सोयाबीन उत्पादक मरणासन्न अवस्थेत आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली होती. यावर्षी मात्र त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या सोयाबीन उत्पादनात किमान ७० टक्क्यांनी कमी येणार असल्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची हीच परिस्थिती आहे. दरवर्षी अत्यल्प उत्पादन व निकृष्ट दर्जाचे बियाणे यामुळे पुढील हंगामासाठी सोयाबीनचे दर्जेदार बियाणे मिळणे दुरापस्त झाले आहे.
महाबीजचे प्लॉटदेखील निकृष्ट आहेत. अन्य बियाणे कंपन्यांचीसुद्धा हीच परिस्थिती आहे. राज्यात सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील सोयाबीन उत्पादकांचीदेखील सद्यस्थिती अतिशय वाईट आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातून उपलब्ध होणारे सोयाबीन दरवर्षीप्रमाणे बोगसच राहणार आहे. यामुळे १०० दिवसांचे कॅश ड्रॉप यानंतर दुर्लभ होईल. शेतकऱ्यांना यापुढे परंपरागत पिकांवरच मदार ठेवावी लागणार आहे. सोयाबीन हे पीक नगदी असले तरी श्ेतकऱ्यांना आता त्यावर अधिक अवलंबून राहता येणार नाही. तेव्हा अन्य पर्यायाचा वापर करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा, असे मत कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोयाबीनचा पुढील हंगाम देखील फारसा लाभदायक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून न राहता इतरही लागवणीचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)