वणीत अकरावी प्रवेशाचा प्रश्न चिघळणार
By Admin | Updated: July 28, 2016 01:07 IST2016-07-28T01:07:38+5:302016-07-28T01:07:38+5:30
वणी उपविभागातील तील विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या विषयात

वणीत अकरावी प्रवेशाचा प्रश्न चिघळणार
चर्चा निष्फळ : शुक्रवारपासून पदाधिकाऱ्यांचे बेमुदत तर विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण
वणी : वणी उपविभागातील तील विद्यार्थ्यांचा अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या विषयात शिक्षण विभागाशी झालेली चर्चाही निष्फळ ठरल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली २९ जुलैपासून स्वप्नील धुर्वे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. याविषयी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार संघटनेने केला आहे.
वणी उपविभागातील विद्यार्थ्यांना अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी ५ जुलैै रोजी ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली १८३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मागेल त्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल व कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असा शब्द शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र १० दिवसानंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. यासंदर्भात विचारणा केली असता, आम्ही वणीतील महाविद्यालयांना यादी पाठविली आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही प्रवेशाचा प्रश्न सुटला नाही.
१६ जुलैैला येथील महसूल भवनात विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने प्रवेशासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तरीही प्रवेश रखडले. लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. त्याचाही उपयोग झाला नाही. २१ जुलैैला पुन्हा यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
त्यावेळीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशाची हमी दिली. मात्र आता जुलैै महिन्या संपत आला असला तरी अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न कायम आहे. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया न झाल्यास शुक्रवार २९ जुलैैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ या संघटनेचे स्वप्नील धुर्वे यांनी दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा
अकरावी प्रवेशाच्या प्रकरणात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल केली असून या प्रकरणाची उच्चस्तरिय चौैकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौैजदारी कारवाई करण्याची मागणी स्वप्नील धुर्वे यांनी केली आहे. बुधवार आमरण उपोषणासंदर्भात वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.