‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही साहित्यिक संमेलनाकडे फिरकला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 21:34 IST2019-01-13T21:01:08+5:302019-01-13T21:34:03+5:30
‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही.

‘निषेध हवा, बहिष्कार नको’ म्हणणारा एकही साहित्यिक संमेलनाकडे फिरकला नाही
प्रज्ञा केळकर-सिंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेध नोंदवा, बहिष्कार नको’, असे आवाहन मान्यवर साहित्यिकांनी संमेलनाच्या आदल्या दिवशी केले होते. मात्र, असे आवाहन केलेला एकही साहित्यिक यवतमाळला फिरकला नाही.
संमेलनात सहभागी व्हावे, अरुणा ढेरे यांची भूमिका जाणून घ्यावी, असे निवेदनाद्वारे आवाहन करणाऱ्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, दिलीप माजगावकर, जयराज साळगावकर, डॉ. स्नेहलता देशमुख, शेषराव मोरे, मंगला गोडबोले, द. मा. मिरासदार, पांडुरंग बलकवडे यांनी मांडले. त्याचवेळी विजय भटकर, दिलीप करंबेळकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. विलास खोले, प्रदीप रावत, रेखा इनामदार, योगेश सोमण, नामदेव कांबळे, अविनाश धर्माधिकारी, सतीश जकातदार, प्र. के. घाणेकर, अरुण करमरकर, अश्विनी मयेकर आदींनी निवेदनाद्वारे संमेलनाला उपस्थिती लावण्याचे आवाहन केले होते.
हजारो साहित्यप्रेमींचा हिरमोड होऊ नये, संमेलनाध्यक्षांचे प्रगल्भ विचार आणि घडलेल्या घटनेबाबतची भूमिका समजून घेता यावी, यासाठी बहिष्कार न घालता महामंडळ आणि आयोजकांच्या कृतीचा निषेध करावा, पण त्याचवेळी संमेलनाध्यक्षांचा अवमान होऊ नये म्हणून हे संमेलन यशस्वी करावे असे वाटते’, अशी भावना या साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात यापैकी एकानेही उपस्थिती न लावल्याने साहित्य वतुर्ळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रसिकांना आवाहन करणाºयांनी संमेलनात हजेरी लावून आपली भूमिका मांडायला हवी होती, असे मतही व्यक्त होत आहे.
साहित्यिकांची अनुपस्थिती, रसिकांची निराशा
साहित्यिकांच्या भेटीसाठी संमेलनस्थळी दाखल झालेल्या श्रोत्यांची साहित्यिकांच्या बहिष्काराने पुरती निराशा झाली. त्यामुळे संमेलन स्थळी दाखल झालेले ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रवीण दवणे, भारत सासणे या मोजक्या साहित्यिकांसोबत सेल्फी घेण्यासाठी श्रोत्यांची गर्दी होत होती. हे साहित्यिक जेथे जातील तेथे श्रोते त्यांच्याभोवती गराडा घालत होते.