पाठिंबा काढल्याने फरक नाही
By Admin | Updated: June 24, 2014 00:06 IST2014-06-24T00:06:38+5:302014-06-24T00:06:38+5:30
शिवसेनेने जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचा पाठिंबा काढला असला तरी त्याचा कामकाजावर कोणताही फरक पडणार नाही. येथे प्रत्येकजण पक्षभेद विसरूनच निर्णय घेतात, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख

पाठिंबा काढल्याने फरक नाही
जिल्हा परिषद अध्यक्ष : भूमिका बदलण्याची वेळ चुकली
यवतमाळ : शिवसेनेने जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचा पाठिंबा काढला असला तरी त्याचा कामकाजावर कोणताही फरक पडणार नाही. येथे प्रत्येकजण पक्षभेद विसरूनच निर्णय घेतात, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.
अध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अशा स्थितीत पाठिंबा काढण्याची भूमिका घेण्याची गरज नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे हे गटबंधन तयार करून सत्ता स्थापन करण्यात आली. येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम करताना कुणीही पक्षभेद पाळत नाही. लोकाभिमुख निर्णय येथे एकमताने घेतले जातात. त्यामुळे पाठिंबा काढल्यानंतरही निर्णय प्रक्रियेवर फरक पडणार नाही, असे प्रवीण देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्याला कार्यकाळ पूर्ण होत असला तरी अविश्वास आणण्याची स्वप्न पडत आहे, असे देशमुख म्हणाले. काँग्रेसची कुठलीही नाराजी नाही. केवळ एका व्यक्तीची नाराजी आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्षांची भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असते. अविश्वासाबाबतची भूमिका गटनेत्याची आहे. त्यात काही तथ्य नाही. इतके वर्ष सत्तेत राहिल्याने सत्ता दूर गेल्यामुळे त्यांना स्वस्थ बसवत नाही. त्यामुळेच काँग्रेस गटनेता अविश्वासाची भाषा करत आहे. गटनेता सत्तेत असतानाच त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अशा गटनेत्याला आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही प्रवीण देशमुख यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष ययाती नाईक, शिक्षण सभापती मनमोहनसिंह चव्हाण उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)