सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराचा विस्तार झाला. नगरपरिषदेमध्ये सात ग्रामपंचायती २०१६ मध्ये समाविष्ट झाल्या. तरीही शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. नगरपालिकेकडे सावरगड कचरा डेपो वगळता इतर कुठलीही हक्काची जागा नाही. थोडी बहुत शेती भाडेपट्ट्यावर घेऊन संपूर्ण कचरा वन विभागाच्या हद्दीत फेकला जात आहे. कचरा उघड्यावर टाकायचा, तो जाळून नष्ट करायचा असा प्रकार सुरू आहे. यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
यवतमाळ शहरात एकूण २८ प्रभाग आहे. येथे दिवसाला ११० मेट्रिक टन घनकचरा निघतो. या घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी चार झोन तयार केले आहे. त्यापैकी झोन क्र. १ व ४ येथे निघणारा घनकचरा बेमुर्वतपणे कोणतेही नियम न पाळता उघड्यावर फेकला जात आहे. यवतमाळकरांची घाण टाकळी जंगल परिसर व शेतशिवारात सोडण्यात येत आहे. यातून टाकळी तलाव भविष्यात दूषित होण्याच्या स्थितीत आला आहे.
नगरपरिषदेने स्वच्छ व सुंदर शहरासाठी वर्षाला १२ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. शहरातून घंटागाडी, ट्रॅक्टर या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. अर्थात ही प्रक्रिया पूर्ण नियंत्रणात नाही. काही भागात घंटागाड्या चार दिवस पोहोचत नाही. अशा वेळी परिसरातील नागरिक कचरा उघड्यावर टाकतात. दुर्गंधी सुटायला लागली की, कधी तरी ट्रॅक्टर किंवा घंटागाडी येऊन तो कचरा घेऊन जातात.
टाकळी येथे कचरा टाकण्यासाठी जाण्यास योग्य रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात बरेचदा जागा मिळेल त्या ठिकाणी कचऱ्याचे ट्रॅक्टर, घंटागाडी रिकामी केली जाते. यामुळे यवतमाळ शहराच्याच पिंपळगाव परिसरात दुर्गंधी निर्माण होते. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. या अधीन राहूनच नगरपरिषदेला केंद्र सरकारकडून वित्त आयोगाचा निधी प्राप्त होतो. प्रत्यक्षात मात्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे निकष पायदळी तुडविले जात आहे. यातूनच ही समस्या उभी ठाकली आहे.
कुजलेली जनावरे उघड्यावर शहरात भटके कुत्रे, डुक्कर, जनावरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह खोल खड्डा करून जमिनीत पुरणे अपेक्षित आहे. असे न करता ट्रॅक्टरमध्ये मेलेल्या प्राण्यांना टाकून थेट टाकळी जंगल परिसरात फेकले जात आहे.
रुग्णालयातील कचरा उघड्यावररुग्णालयातून वॉर्डात उरलेले अन्न, फळांच्या साली व इतर कचरा नग रपालिका उचलते. या कचऱ्या- सोबत जैविक कचराही आणला जात आहे. हा कचरासुद्धा उघड्यावर जंगल परिसरात फेकण्यात येत आहे.
धामणगाव बायपासवर तशीच स्थितीशहरातील तलाव फैल परिसराला लागून असलेल्या धामणगाव बायपासजवळ नगरपा- लिकेने भाडेतत्त्वावर शेत घेतले आहे. या शेतातसुद्धा शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही. कचऱ्याचे ढीग जेसीबीने सपाट केले जातात. नंतर त्यात आग लावली जाते. यातील प्लास्टिक व इतर अनेक टाकावू वस्तू जळल्याने विषारी धूर बाहेर पडतो. यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. शिवाय परिसरातील नाल्यामध्ये घाण जात आहे, हे पाणी थेट बोरगाव डॅमपर्यंत जाते. यावरून ही प्रदूषणाची साखळी नगरपालिकेच्या चुकीमुळे लांबपर्यंत पोहोचली आहे.