शिवसेनेत अंतर्गत कलह सुरूच
By Admin | Updated: June 26, 2014 23:31 IST2014-06-26T23:31:55+5:302014-06-26T23:31:55+5:30
वणीत शिवसेनेत गेल्या काही काळापासून अंतर्गत कलहाला सुरूवात झाली आहे. या पक्षात उभे दोन गट पडले असून केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यासच दोनही गटातील पदाधिकारी एकत्र दिसतात.

शिवसेनेत अंतर्गत कलह सुरूच
रवींद्र चांदेकर - वणी
वणीत शिवसेनेत गेल्या काही काळापासून अंतर्गत कलहाला सुरूवात झाली आहे. या पक्षात उभे दोन गट पडले असून केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यासच दोनही गटातील पदाधिकारी एकत्र दिसतात. अन्यथा त्यांची तोंडे सदैव वेगळ्या दिशांना वळलेली असतात, असा वणीकरांचा अनुभव आहे. त्यातही या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी बाहेरून एखादा ‘तगडा’ उमेदवार पक्षात आणण्यासाठी मोहिमच सुरू केली की काय, असे दिसून येत आहे.
महायुतीत वणी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. सन २00४ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विश्वास नांदेकर यांना शिवसेनेने उमेदवारी बहाल केली होती. पहिल्याच झटक्यात ते निवडूनही आले होते. त्यावेळी काँंग्रेस आणि शिवसेनेत थेट लढत झाली होती. त्याचा लाभ नांदेकर यांना मिळाला होता. त्यानंतर शिवसेनेने या विधानसभा क्षेत्रात चांगलेच बस्तान बसविले होते ग्रामीण भागात पक्षाने वर्चस्व निर्माण केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातच शिवसेनेची ओहोटीही सुरू झाली. परिणामी सन २00९ मधील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार नांदेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या पराभवाला त्यावेळी रिंगणातील तगडे अपक्ष उमेदवारही कारणीभूत ठरले. दरम्यान गेल्या पाच वर्षांत बरेच बदल झाले. नांदेकर यांच्या वर्चस्वाला छेद देत पक्षात काही पदाधिकारी, कार्यकर्ते ‘ताकदवान’ झाले. परिणामी पक्षात गटबाजी सुरू झाली. सध्या या पक्षात कुणीही अन् कितीही काही म्हणत असले, तरी दोन गट कार्यरत आहे. पक्षाची वणी नगरपरिषद, तसेच वणी व मारेगाव पंचायत समितीवर सत्ता आहे. त्यात नगरपरिषदेचे सत्ताधारी एका गटात, तर पंचायत समितीचे सत्ताधारी दुसऱ्या गटात, असे चित्र आहे. भाऊ आणि भैय्या, अशी या पक्षाची वाटणी झाली आहे. एक गट ‘भाऊं’च्या उमेदवारीकडे आस लावून बसला आहे, तर दुसरा गट बाहेरून पक्षात कुणी मातब्बर येतो काय, याची आस लावून बसला आहे.
‘भैय्या’ गटाचा ‘भाऊं’च्या गटाला विरोध आहे. तथापि पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यास दोनही गट अगदी गुण्या-गोविंदाने एकत्र राहात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वरिष्ठांनाही वणीच्या शिवसेनेत प्रचंड ‘एकी’ असल्याचे वाटत असले, तरी आतून मात्र पक्ष पोखरला जात आहे. शिवसेनेचे सामान्य कार्यकर्तेही या दोन गटात विभाजीत झाले आहे. मात्र या सर्वांमध्ये शिवसेनेचा मतदार एकनिष्ठ आहे. त्यांना भाऊ आणि भैय्या या दोहोंपेक्षा, धनुष्यबाणाचे आकर्षण आहे. त्या चिन्हावर कुणीही उमेदवार असला, तरी त्यांना कोणताच फरक पडत नाही. हीच शिवसेनेची खरी ताकद आहे. नेते केवळ आपल्या स्वार्थासाठी गटातटात विभागले जात आहे.
शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असल्याने युतीतील भाजप आणि स्वाभिमानीचे त्यावर बारीक लक्ष आहे. त्यातूनच या दोनही पक्षांनी वणी विधानसभेवर दावा ठोकून शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असल्याने विधानसभा उमेदवारीसाठी प्रचंड चुरस राहणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच दोनही गट कामाला लागले आहेत. सेनेतील अंतर्गत कलहाचा लाभ घेत भाजप आणि स्वाभिमानीने आपला दावा वणीवर ठोकून या दोनही गटाला चपराक लगावली. तरीही किमान येत्या विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेच्याच वाट्याला राहण्याची शक्यता दिसत आहे.