राळेगावात वकिलाच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:05+5:30
अॅड. प्रीतेश कैलासचंद्र वर्मा हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी घरात असलेले तीन लोखंडी व एक लाकडी असे चार कपाट फोडले. त्यांनी मंगळसूत्र, दोन अंगठ्या, लॉकेट, कानातील लटका असे एकूण एक लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख चोरुन नेले.

राळेगावात वकिलाच्या घरी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहरातील भवानी मंदिर परिसरात राहणाऱ्या वकिलाचे घर फोडून चोरट्यांनी दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
अॅड. प्रीतेश कैलासचंद्र वर्मा हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी घरात असलेले तीन लोखंडी व एक लाकडी असे चार कपाट फोडले. त्यांनी मंगळसूत्र, दोन अंगठ्या, लॉकेट, कानातील लटका असे एकूण एक लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व सहा हजार रुपये रोख चोरुन नेले. वर्मा कुटुंबीय सकाळी परत आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे दिसले. आत प्रवेश केला असता चोरी झाल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती ठाणेदार अमोल मुडे यांना देण्यात आली. त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनलाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढला. घरापासून चार ठिकाणी चोरटे गेल्याचे श्वानाने दाखविले. येथील गांधी यांच्या घराच्या परिसरात श्वान घुटमळला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ठसे तज्ज्ञांनीही घरातील विविध वस्तूंवरचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला. थंडीचा कडाका असल्याने प्रत्येक जणच दारे खिडक्या बंद करून झोपतो. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बिनधास्तपणे वर्मा यांच्या घरी हात साफ केला. या गंभीर घटनेने राळेगाव शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
चोरट्यांची दहशत असल्याने आता रात्री घराबाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात अॅड. प्रीतेश वर्मा यांच्या तक्रारीवरून राळेगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.