बोरगावात अघटित घडले... आंघोळ करताना युवक नदीत वाहून गेला
By विलास गावंडे | Updated: August 21, 2023 13:59 IST2023-08-21T13:58:00+5:302023-08-21T13:59:32+5:30
घटनास्थळी बघ्यांची गर्दी

बोरगावात अघटित घडले... आंघोळ करताना युवक नदीत वाहून गेला
अकोला बाजार (यवतमाळ) : सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा होत असताना बोरगाव पुंजी या गावात अघटित घडले. पूजेसाठी आंघोळ करताना युवक अडाण नदीत वाहून गेला. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश सुभाष राठोड (१८) रा. बोरगाव पुंजी, असे या युवकाचे नाव आहे.
याेगेश हा नागपंचमीनिमित्त पूजा करण्यासाठी अडाण नदीकाठावर असलेल्या ऊत्तरेश्वर शिवमंदिरात दूध व पूजेचे साहित्य सोबत घेऊन गेला होता. तत्पूर्वी तो लगतच्या अडाण नदीत स्नान करण्यासाठी गेला. पाय घसरून पुराच्या प्रवाहात गटांगळ्या खात वाहून गेला. या प्रकाराची माहिती त्याठिकाणी उपस्थित मुलांनी गावात दिली. गावातील काही जणांनी पुरात पोहून योगेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुपारपर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.