वणी हादरली ! कोलार पिंपरी खाणीत तीन महिन्यांपासून कोळसा जळतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:35 IST2025-07-29T12:34:04+5:302025-07-29T12:35:02+5:30
वेकोलि प्रशासनाचे दुर्लक्ष : कामगारांचे आरोग्य संकटात, मोठे नुकसान

The Vani is in danger! Coal has been burning in the Kolar Pimpri mine for three months.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी (यवतमाळ) : वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोलार पिंपरी खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील तीन महिन्यांपासून कोळशाला लागलेली आग धगधगत आहे. यात वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना या आगीची दाहकताही सोसावी लागत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, वेकोलि प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रात सद्यस्थितीत १५ लाख ९४ हजार २३७टन कोळशाचा साठा आहे. यात कोलार पिंपरीमध्ये पाच लाख ८७ हजार, उकणी कोळसा खाणीत सहा लाख ८९ हजार ४२, घोन्सा कोळसा खाणीत एक लाख ५९ हजार ६७२, भांदेवाड्यात दोन हजार ८५४ व जुनाड खाणीत एक लाख ५५ हजार १०३ टन कोळशाचा साठा आहे. कोलार पिंपरीत एवढा मोठा कोळशाचा साठा नियमानुसार न ठेवल्याने तसेच त्याची विल्हेवाट त्वरित न लावल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आता या आगीसंदर्भाने झालेल्या या नुकसानाची जबाबदारी कोणावर निश्चित करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत उकणी, कोलार पिंपरी, जुनाड, पिंपळगाव, भांदेवाडा, घोन्सा याठिकाणी कोळसा खाणी आहेत. या खाणींतून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन घेतले जाते. खाणींतून काढलेला कोळसा हा कोल स्टॉकवर साठवला जातो. या साठवलेल्या कोळशाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आग लागते. त्यावर उपाय म्हणून पाणी शिंपडले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण करता येते.
कोलार पिंपरी खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील तीन महिन्यांपासून सातत्याने आग धगधगत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात वेकोलि प्रशासन अपयशी ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे जुलै २०२३ मध्ये या खाणीतील कोळशाच्या साठ्याला फार मोठी आग लागली होती. पण ती तेव्हा लवकरच नियंत्रणात आली होती.
"कोळशाचे योग्य कॉम्पॅक्टिंग झाले नाही. तसेच कोळशाचा साठा अधिक असल्याने गॅस तयार होतो. त्यामुळे ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवणे सुरू आहे."
- डॉ. सुरेश घरडे, उपक्षेत्रीय प्रबंधक, कोलार पिंपरी