यवतमाळ : परीक्षा म्हटले की अनेकांना घाम फुटतो; पण यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना दुसऱ्याच एका कारणामुळे घामाघूम व्हावे लागत आहे. अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.
कोरोनामुळे बोर्डाने शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले. मात्र, अनेक शाळांमध्ये योग्य इमारत, पंखे, पाण्याची सुविधा नाही. या शाळा केवळ अनुदानापुरत्या सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी त्यांना आपल्या शाळेत केंद्र द्यावे लागले आणि त्यातूनच त्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आली आहे.
अनेकांना आली भोवळ
काही जिल्ह्यांमध्ये इमारती नसल्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा चक्क गोदामात घेतल्याचे प्रकार पुढे येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात असा प्रकार नसला तरी बऱ्याच शाळांकडे योग्य इमारत नसल्याचा प्रकार आहे. तेथे प्रचंड उकाडा सहन करीत पेपर सोडविताना काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याचे प्रकार घडले आहेत.
कमी पटाच्या शाळांची बनवाबनवी
शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले जाणार असले तरी त्यासाठी जादा पटसंख्येची अट ठेवण्यात आली, त्यामुळे ज्या शाळांकडे नियमाप्रमाणे सोयीसुविधा नाही, त्यांनी या अटीचा अचूक फायदा घेऊन आपली बनवाबनवी लपविली.
१५ पेक्षा कमी पट असलेल्या शाळेतील परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात जोडण्यात येणार आहे. हे कळताच सुविधा नसलेल्या शाळांनीही आपल्याकडे कमी पट असल्याची बतावणी करून आपले परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात पाठवून दिले.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सुविधा नसलेल्या शाळांमध्ये परीक्षार्थ्यांचे हाल होत आहे. मात्र, परीक्षेच्या काळात अभ्यास करावा की तक्रारी कराव्या, या विचारातून विद्यार्थी व त्यांचे पालक गप्प आहेत. परीक्षेमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागत आहे.
आपल्या जिल्ह्यातील केवळ एका शाळेची केस आपल्यापर्यंत आली होती. त्यांच्या शाळेचे छत वादळी पावसात उडून गेले आहे, त्यामुळे तेथे परीक्षा केंद्र देऊ नये, अशी विनंती या शाळेनेच केली होती. म्हणून आपण तेथे दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र न देता तेथील विद्यार्थी जवळच्या मुख्य परीक्षा केंद्राला जोडून दिले. सोयीसुविधा पाहूनच आपण परीक्षा केंद्र दिले आहे.
-डाॅ. जयश्री राऊत-घारफळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी