दारावर लाथा मारणे जिवावर बेतले, जावयाने केला सासऱ्याचा खून

By विलास गावंडे | Updated: February 2, 2024 17:50 IST2024-02-02T17:49:46+5:302024-02-02T17:50:12+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील घटना : काठीने केले डोक्यावर प्रहार.

the son in law killed the father in law | दारावर लाथा मारणे जिवावर बेतले, जावयाने केला सासऱ्याचा खून

दारावर लाथा मारणे जिवावर बेतले, जावयाने केला सासऱ्याचा खून

जवळा (यवतमाळ) : रागाच्या भरात जावयाने सासऱ्याचा काठीने हल्ला करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास म्हसोला कान्होबा (ता.आर्णी) येथे घडली. इस्तारी नेवारे (४३), असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी जावई रवींद्र देवराव बोटरे (३२) रा.म्हसोला कान्होबा ता.आर्णी याला आर्णी पोलिसांनी अटक केली आहे.

इस्तारी नेवारे पत्नीपासून अलिप्त होते. ते मुलीकडे राहात होते. त्यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्री मुलगी, जावई झोपलेले असताना इस्तारी नेवारे यांनी दारूच्या नशेत जेवणाच्या कारणावरून दाराला लाथा मारल्या. या प्रकारातून सासरे जावयात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. जावयाने घराच्या आवारात ठेऊन असलेल्या लाकडी काठीने सासऱ्याच्या डोक्यावर प्रहार केला. जबर मार लागल्याने सासरे खाली कोसळून जागीच ठार झाले.

माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. नागरिकांनी या प्रकाराची माहिती आर्णी पोलिसांना दिली. लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून जावयाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलिस करीत आहे.

Web Title: the son in law killed the father in law