महाराष्ट्राच्या प्रेरणादायी मातीला वंदन करून रामकथा थाटात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:00 IST2025-09-08T12:59:11+5:302025-09-08T13:00:48+5:30
प्रसिद्ध कथाकार मोरारीबापू यांच्या रामकथेसाठी देशभरातील भाविकांची मांदियाळी

महाराष्ट्राच्या प्रेरणादायी मातीला वंदन करून रामकथा थाटात प्रारंभ
- विशाल सोनटक्के, यवतमाळ
‘छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि आचार्य विनोबा भावे यांच्या भूमीने देशाला अमूल्य योगदान दिले आहे. वारकरी परंपरेच्या या मातीला मी वंदन करतो,’ अशा शब्दांत प्रसिद्ध कथाकार मोरारीबापूंनी अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी यवतमाळमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामकथेचा शुभारंभ केला. कथापर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा व दर्डा परिवाराने चिंतामणी बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून शोभायात्रेद्वारे पोथी मुख्य मंचावर आणली.
यावेळी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा, मंत्री संजय राठोड, प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगूळकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांच्यासह सीमा दर्डा, सुनित कोठारी, पूर्वा कोठारी, लव दर्डा, राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, प्रवीण चंद्रकोटक (अहमदाबाद), आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सीए जयेंद्रभाई शहा, जीजेईपीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे कोषाध्यक्ष किरीटभाई भन्साळी, युनिकेम लॅबोरिटरीज लि.चे चेअरमन प्रकाश मोदी, प्रसिद्ध उद्योगपती संजयभाई ठक्कर, मनमोहन पटेल (कॅलिफोर्निया), राजेशभाई दोशी (मुंबई), रेमंडचे समूह सीएफओ अमित अग्रवाल, विकास शहा (अहमदाबाद),
मुंबईचे व्यावसायिक महेंद्र सुंदेश, रमेश अग्रवाल, छत्रपती संभाजीनगरचे विवेक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.‘डॉ. विजय दर्डा यांनी आई व पत्नीच्या इच्छेसाठी अल्पावधीत हा भव्य सोहळा उभा केला. त्यांना मी प्रमाणपत्र नव्हे, तर प्रेमपत्र देतो,’ असे मोरारीबापूंनी गौरवोद्गार काढले.
रामकथा पर्वाद्वारे संस्काराच्या बीजाचे रोपण : डॉ. विजय दर्डा
“मोरारीबापूंच्या उपस्थितीने यवतमाळच्या मातीला पावित्र्य लाभले. या रामकथेतून भक्तिगंगा गतिमान होऊन संस्कारांचे बीज रुजेल,” असा विश्वास डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केला. आई वीणादेवी व पत्नी ज्योत्स्ना यांच्या इच्छेमुळे रामकथेचे आयोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे विजय मुंधडा, राजेश बोरा, सुनील जैन, माणिकराव ठाकरे, हरिभाऊ जाधव तसेच पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता व प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.
नैतिकता व चारित्र्याची शिकवण
डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, ‘राम भारतीयांच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. मोरारीबापूंच्या रामकथेच्या माध्यमातून जगभरात नैतिकता, चारित्र्य व मूल्यांची प्रतिष्ठापना केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा यांनी सत्तेत राहून निष्कलंक व्यक्तिमत्त्व जपले. त्यांची परंपरा आज डॉ. विजय दर्डा व राजेंद्र दर्डा ‘लोकमत’च्या माध्यमातून पुढे नेत आहेत.’अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
‘रामचरितमानस’मध्ये ‘लोकमत’
प्रवचनात मोरारीबापूंनी सांगितले, ‘सध्या पितृपक्ष सुरू आहे. त्यामुळे कथेला “मानस मातृ-पितृपक्ष” हा विषय ठेवला आहे. मानसामध्ये ‘लोकमत’ शब्द आढळतो. भारतीय परंपरेत साधुमत, लोकमत, वेदमत व राष्ट्रमत यांना महत्त्व आहे. यवतमाळच्या रामकथेचे आयोजक डॉ. विजयबाबूंच्या रूपाने ‘लोकमत’ पुढाकार घेत आहे. रामकथा ही प्रेमराज्य घडवणारी असल्याने नव्या पिढीने यातून नवजीवन घ्यावे,’ असे ते म्हणाले.