माणसांचा बाजार अन् कष्टाचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 05:00 AM2022-05-29T05:00:00+5:302022-05-29T05:00:33+5:30

सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. 

The people's market and the auction of hardships | माणसांचा बाजार अन् कष्टाचा लिलाव

माणसांचा बाजार अन् कष्टाचा लिलाव

Next

रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ असते असे म्हणतात. तीच गत मजूर वर्गाची झाली आहे. गावात काम मिळत नाही म्हणून यवतमाळलगतच्या गावातील काही मजूर पहाटेच येथील कामगार चौकात गोळा होतात. आपल्याला रोजगार देण्यासाठी कुणी तरी नक्की येईल म्हणून कामगार  दोन ते तीन तास ताटकळत बसतात. मात्र प्रत्येकांच्या वाट्यालाच रोजंदारी मिळेलच, याचा नेम नसतो. त्यांना दररोजच्या भाकरीची कायम चिंता असते. अनेकांना तर काम न मिळाल्याने रिकाम्या हाताने गावी परत जावे लागते.
यवतमाळातील कामगार चौक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूनम चौक आणि वडगाव नाक्यावर दररोज पहाटेपासून मजुरांची गर्दी पहायला मिळते. सकाळी ८ वाजतापासून ते १० वाजतापर्यंत हे कामगार चौकात रोजगार मिळावा म्हणून उभे असतात. प्रत्येकजण रोजगारासाठी आतूर असतो. कुणीतरी एखादा मालक रोजमजूर हवा म्हणून या चौकात येताे. तो कंत्राटदाराशी सौदा करताे. त्यानंतर कामासाठी आवश्यक ते मजूर घेऊन मालक परत निघताे. मात्र, तेथे गोळा झालेल्यांपैकी मोजक्याच हातांना काम मिळते. इतरांना रोज मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. 
  यवतमाळलगतच्या बाभूळगाव, कळंब, घाटंजी, नेर, दारव्हा तालुक्यातील मालखेड, सावर, गळव्हा, जवळा, नेर, मंगरूळ, माणिकवाडा, चाणी, कामठवाडा, चिकणी, लिंगा, बोरजई यांसह अनेक गावातून मजूर या ठिकाणी भल्या पहाटेच हजर होतात. पहाटेपासूनच मजुरांची यवतमाळकडे धाव सुरू होते. त्याकरिता प्रत्येक मजूरदार कुटुंबाची पहाटेच धावपळ सुरू होते. दुचाकी, टेम्पो, टॅक्सी, एसटी यांसारख्या वाहनाने कामगार यवतमाळात दाखल होतात. त्यामुळे पहाटेपासूनच सुसाट वेगाने यवतमाळचे रस्ते हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळते. 

आधी गांधी चौक आता पूनम चौक, वडगाव नाका
कामगार चौकाला एक इतिहास आहे. प्रारंभी गांधी चौकात कामगारांची गर्दी होत  होती. आता हे ठिकाण बदलून पूनम चाैक आणि वडगाव नाक्यावर गेले आहे. या दोन्ही ठिकाणी ते गोळा होतात. कारण हेच ठिकाण त्यांच्या घरची चूल पेटविते. मजुरी लागल्यास, चूल पेटते. मजुरी न लागल्यास रिकाम्या हाताने परत जाताना पुन्हा उद्याची चिंता सतावत असते. 

 ठेकेदाराला द्यावे लागते परसेंटेज 
यवतमाळात येणाऱ्या प्रत्येक मजुराला काम मिळाल्यावर ठेकेदाराला परसेंटेज द्यावे लागते. मात्र, काम न मिळाल्यास रिकाम्या हाताने परतावे लागते. त्याची शाश्वती ठेकेदार घेत नाही. अनेक कामगार कामाच्या शोधात दुपारपर्यंत ठाण मांडून बसतात. तोपर्यंत काम न लागल्यास घरी परतात. परतताना चिमुकल्यांसाठी ‘भातकं’ नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसतात.

 

Web Title: The people's market and the auction of hardships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.