लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीचा हंगाम, निवडणुकीची आचारसंहिता आदी कारणे पुढे करत या अधिकाऱ्यांच्या बदल्या टाळल्या जात असून, त्यांना अप्रत्यक्षपणे अघोषित अभय दिले जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
महामंडळाच्या बदली धोरणांतर्गत वर्ग एक आणि वर्ग दोनमधील विभाग नियंत्रक, अभियंते, प्रादेशिक व्यवस्थापक तसेच उन्नत गटातील सहायक वाहतूक अधीक्षक, सहायक कार्यशाळा अधीक्षक, विभागीय लेखाकार, आस्थापना पर्यवेक्षक, वाहतूक पर्यवेक्षक, भांडार पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ संगणकचालक, वरिष्ठ संगणकचालक आदी अधिकाऱ्यांची एका ठिकाणी तीन वर्षे सेवा झाल्यानंतर बदली केली जाते. या धोरणाला महामंडळाकडून मूठमाती दिली जात आहे. काही अधिकारी पाच वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.
महामंडळाच्या यवतमाळ विभागात विभागीय अभियंता (स्थापत्य) म्हणून नितीन गावंडे दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीसंदर्भात यवतमाळ येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण मिश्रा यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. गावंडे यांचा पदोन्नतीनंतरचा तीन वर्षांचा कार्यकाळ १ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला आहे. महामंडळाच्या तरतुदीनुसार त्यांची प्रशासकीय बदली करण्याची कार्यवाही केली जात असल्याची माहिती जनमाहिती अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी प्रवीण मिश्रा यांना दिली आहे. आता गावंडे यांची बदली निश्चित मानली जात आहे. विविध आयुधांचा वापर करून काही अधिकारी, कर्मचारी बदली रद्द करणे, सोयीच्या ठिकाणी बदली करून घेत असल्याचेही सांगितले जाते.
जूनमध्ये सुरू झाली प्रक्रिया
जून २०२५ पूर्वी बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी गर्दीचा हंगाम असल्याचे कारण पुढे करत कार्यवाही थांबविण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. ती संपत नाही तोच महानगरपालिकेची आचारसंहिता लागली. त्यामुळे या मुक्कामी कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत बदल्यांचा मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न आहे.