निवडणूक आयोगाने टाकला मतदारांच्या मतांवर दरोडा : विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:02 IST2025-01-27T18:00:05+5:302025-01-27T18:02:29+5:30
Yavatmal : ७६ लाख मतदार वाढले कसे, याचे उत्तर दिले नाही

The Election Commission has robbed voters of their votes.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया ही पारर्दशक व निष्पक्ष वातावरणात होणे आवश्यक आहे. तरच मतदारांच्या मताचा सन्मान होतो. यासाठीच देशात स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. भाजप सरकारच्या काळात निवडणूक आयोग पूर्णतः बदलले असून केवळ एका पक्षासाठी काम करत आहेत. विधानसभा निवडणुकीत ७६ लाख मतदार अचानक वाढले कसे, या प्रश्नाचे उत्तर अजूनही निवडणूक आयोगाने दिले नाही. मतदारांच्या मतावर दरोडा टाकण्याचे काम निवडणूक आयोगाने केले आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रपरिषदेतून केला. मतदार दिनानिमित्ताने काँग्रसेने संपूर्ण राज्यात निषेध आंदोलन केले.
संविधानामुळे २५ जानेवारी रोजी भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क मिळाला. आज या मताचे पवित्र नष्ट केले जात आहे. मतदानाच्या हक्कातून देशातील लोकशाही बळकट झाली आहे, यातून देशाची जडणघडण झाली आहे. दुर्दैवाने आज निवडणूक आयोग व आयुक्त प्रामाणिकपणे काम करत नाही. भाजपच्या पक्ष कार्यकर्त्यासारखी निवडणूक आयुक्तांची भूमिका आहे. भाजप सरकारच्या काळात देशातील सर्वच स्वायत्त संस्था नामधारी झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सोयीचेच निर्णय घेतले जात आहे. मनुवादी विचारसरणीच्या कल्पनेतून देश चालविला जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
यांची होती उपस्थिती
पत्रपरिषदेला आमदार बाळासाहेब मांगूळकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष पाटील, प्रकाश शर्मा, जितेंद्र मोघे, संतोष बोरले, शशांक केंडे आदी उपस्थित होते.
किरीट सोमय्या यांचे चारित्र्यच संशयास्पद
माजी खासदार किरीट सोमय्या यांचे चारित्र्य संशयास्पद आहे. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते सर्व आज भाजपसोबत सत्तेत आहेत. सोमय्या बिनबुडाचे आरोप करण्यासाठी आहेत. देशात हिंदू- मुस्लिम केल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. यातूनच रोहिग्यांच्या नोंदीचा मुद्दा उचलून काँग्रेसवर खोटे आरोप करत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
लोकशाहीसाठी घातक ठरते आयोगाची भूमिका
- विधानसभा निवडणूक काळात अचानक ७६ लाख मतदार वाढले. ही वाढ कशी केली याचे उत्तर अजूनही दिले नाही. अशा निवडणूक आयोगाचा मतदारदिनी काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाची भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
- भाजपकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही. निवडणुका केवळ जातीय द्वेष निर्माण करून जिंकल्या जात आहेत. हिंदुत्वाचा चष्मा घालून जनसामान्यांची लूट केली जात आहे. देशाच्या रुपयाची किंमत जागतिक पातळीवर घटली आहे. बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यावरून लक्ष विचलित केले जाते.