यवतमाळ : शासनाच्या विविध कामांची देयके कंत्राटदारांना मिळालेली नाही. यातून काहींनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले. आता तर काही कंत्राटदारावर उधारी चुकविण्यासाठी चोरीची वेळ ओढवली आहे. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी आर्णी मार्गावरील झालेल्या नऊ लाखांच्या चाेरीतून उघडकीस आला. अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील शोध पथकाने कौशल्यपणाला लावून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चोरट्याला जेरबंद केले.
शहरातील आर्णी मार्गावर साबीर हुसेन भारमल रा. पांढरकवडा रोड यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे साबीर हे सकाळी ९:३० वाजता दुकान उघडण्यासाठी आले. यावेळी त्यांनी दुकानातील रोख बॅंकेत जमा करण्यासाठी घरून सोबत आणली होती. रोख असलेली बॅग काऊंटरवर ठेवली. तितक्यात एक ग्राहक आला. त्याने मागितलेली वस्तू काढण्यासाठी भारमल मागे वळाले. याच संधीचा फायदा घेऊन रोख रकमेची बॅग पळवून नेली. प्रकरण पोलिसात गेले. दुकान व परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. मात्र, त्यामध्ये संशयित व्यक्ती संपूर्ण चेहरा व अंग झाकून असल्याने कुठलाही सुगावा मिळत नव्हता.
सहजच दुकानात काम करणाऱ्या इतर नोकर व हमालांची चौकशी सुरू केली. यात काहीजण तळेगाव-भारी येथील असल्याचे निष्पन्न झाले. खातरजमा करण्यासाठी पोलिस तळेगाव-भारीमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी त्यांना गुन्ह्यात वापरलेले संशयित वाहन आढळून आले. पोलिसांनी त्या वाहनाच्या मागावरून संशयिताला ताब्यात घेतले. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणीही नसून गावातील उपसरपंच असल्याचे आढळून आले.
तळेगाव-भारी येथील उपसरपंच दिनेश भाऊराव मंडाले (४२) हे साबीर हुसेन यांच्याकडे दूध देण्याचे काम करीत होते. दिनेश मंडाले यांनी गावातील काही रस्त्याचे कंत्राट घेतले. याची देयके शासनाकडे थकली. त्यामुळे उधारी वसुलीसाठी अनेकांचा तगादा सुरू झाला. आर्थिक अडचणीत असलेल्या दिनेश मंडाले यांनी साबीर हुसेन यांच्याकडे पाळत ठेवणे सुरू केले. गुरुवारी संधी मिळताच रोख रक्कम पळविली. शोध पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ लाखांची रोख असलेली बॅग जप्त केली आहे.
शोध पथकाचे कौशल्य
दुकानाच्या काऊंटरवरून रोख असलेली बॅग उडविल्याची घटना सकाळी घडली, यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तपासाला गती दिली. अवधूतवाडी ठाणेदार नंदकिशोर काळे आणि शोध पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांनी कौशल्यपणाला लावून आरोपीपर्यंत पोहोचले. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती चोरीच्या गुन्ह्यात असल्याचे पुढे आले. भक्कम पुराव्याशिवाय ताब्यात घेणे शक्य नव्हते. त्यासाठीही पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा ताळमेळ जुळवून ठोस पुरावे गोळा केले व नंतर पुढची कारवाई केली.
Web Summary : Facing financial strain from delayed government payments, a deputy village head in Yavatmal stole ₹9 lakh from a shop he supplied milk to. Police swiftly arrested him, recovering the stolen money, showcasing their investigative skills.
Web Summary : यवतमाल में सरकारी भुगतान में देरी के चलते आर्थिक तंगी से जूझ रहे एक उपसरपंच ने एक दुकान से ₹9 लाख चुरा लिए। पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए उसे गिरफ्तार कर लिया और चोरी की रकम बरामद कर ली।