‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 02:56 PM2023-11-29T14:56:53+5:302023-11-29T14:57:14+5:30

लाेकशाहीची मूल्ये आलीत धाेक्यात

The concept of creating a 'Hindu Rashtra' is unconstitutional - Shyam Manav | ‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव

‘हिंदू राष्ट्र’ निर्मितीची संकल्पना संविधान विराेधी - श्याम मानव

यवतमाळ : हिंदू राष्ट्र संकल्पनेचा जाहीर प्रचार करताना मनुस्मृतीच्या कायद्याचे उघडपणे समर्थन केले जात आहे. यामुळे हिंदू राष्ट्र संकल्पना ही संविधानाच्या चाैकटीत बसणारी नाही. आताच्या राजकीय परिस्थिती लाेकशाहीची प्रमुख चार मूल्य धाेक्यात आल्याचे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

लाेकशाहीतील समता, बंधुता, न्याय व अभिव्यक्ती ही प्रमुख चार मूल्ये सात्यत्याने पायदळी तुडविली जात आहेत. मागिल दहा वर्षांत प्रशासकीय यंत्रणा ही केवळ राजकीय पक्षासाठी काम करताना दिसत आहे. यामुळेच देशातील एक टक्का वर्गाकडे ५० टक्के संपत्ती एकवटली आहे. दुसरीकडे ५० टक्के वर्गाजवळ केवळ ३ टक्के संपत्ती आहे. विषमतेची दरी सातत्याने वाढत आहे. दाेन धर्मांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम राज्यकर्त्यांकडून केले जात आहे. सरकारी नाेकऱ्या संपुष्टात आणून आरक्षणातून मिळणारी समना संधीदेखील हिरावून घेतली जात आहे.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांंनी आणीबाणी लागत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणले होते. लोकशाहीतील केवळ एक मूल्य बाधित झाल्याने मोठी चळवळ उभी केली. त्यावेळेस मी आंदोलक म्हणून कारावास भोगला. या परिस्थितीत इंदिरा गांधींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणताच दुसऱ्या बाजूने लोकशाही भक्कम होईल, अशा तरतुदी घटनेत केल्या व नंतर सार्वत्रिक निवडणुका लावल्या. त्यावेळी जनसंघाच्या बाजूने प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर आता ४१ वर्षांनंतर सामाजिक क्षेत्रात काम करताना राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे श्याम मानव यांनी सांगितले.

आताच्या राज्यकर्त्यांनी आणीबाणी पेक्षाही भयावह स्थिती निर्माण केली आहे. आणीबाणीच्या काळात किमान ताकदीने विरोधात बोलता येत होते. आता ती सोय राहिलेली नाही. धीरेंद्रकुमार शास्त्रीसारख्या बाबाबुवांना सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण दिले जात आहे. नागपुरात ‘अंनिस’ने या बागेश्वर बाबाला उघड आव्हान दिले होते. तेव्हा बाबा तेथून पळून गेला. त्याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाईची मागणी केली. तर पोलिस दलातील अधिकारीच ही बाब कायद्यात बसत नसल्याचे मला सांगू लागले. ज्या कायद्याचा आराखडा तयार केला, त्या व्यक्तीला कायदा काय हे सांगून पोलिस अधिकारी त्या बाबाला एक प्रकारे संरक्षण देत होते. नंतर भाजपनेच या बागेश्वर बाबाला संपूर्ण महाराष्ट्रात फिरवून त्याचा दरबार भरविला. बागेश्वर बाबांसारखेच संभाजी भिडे जाहीरपणे मनुस्मृती हिंदू राष्ट्राचा कायदा असल्याचे सांगतात. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरतात आणि तेच भिडे आमचे परमपूज्य गुरुजी असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगतात. यातून आपण कुठल्या दिशेला जात आहोत, याचा अंदाज येतो, असेही श्याम मानव यांनी सांगितले.

ते स्मृतीपर्व २०२३ येथे २९ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता हिंदू राष्ट्र संविधान विरोधी आहे का, वास्तव आणि भ्रम यावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानिमित्तच ही पत्रकार परिषद झाली. यावेळी ‘अंनिस’चे अध्यक्ष सचिन साखरकर, शशिकांत फेंडर, स्नेहल फेंडर, माधुरी फेंडर, बंडू बोरकर, श्रद्धा चौधरी, प्रा. काशिनाथ लाहोरे, विलास काळे आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाला ‘सनातन’ची बाधा

- संत ज्ञानेश्वर, नामदेव तुकाराम आणि गाडगे महाराज या सर्व संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. इतकेच नव्हे तर जाती व्यवस्थासुद्धा मोडीत काढली. मात्र, आता सनातनचा विचार वारकरी संप्रदायात शिरला आहे. त्यामुळेच या विचाराला विरोध करणाऱ्यांचा थेट खून केला जात आहे. हिंदू राष्ट्र विरोधात बोलणाऱ्यांना मारून टाकू, असे जाहीरपणे ‘सनातन’च्या दैनिकातून प्रसिद्ध केले जात असल्याचे श्याम मानव यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

Web Title: The concept of creating a 'Hindu Rashtra' is unconstitutional - Shyam Manav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.