सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:22 IST2025-04-07T17:21:48+5:302025-04-07T17:22:56+5:30
सरपण गोळा करण्याची लगबग, योजनेचा बोजवारा : ८५० रूपये आता घरगुती गॅसची किंमत झाली

The common man could not afford gas due to the end of the subsidy.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : घरगुती गॅस सिलिंडरची सतत दरवाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गॅस सिलिंडरचे वाढते दर सर्वसामान्यांना पेलवत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा शेत, जंगलाची वाट धरली आहे. महिलांना उन्हातान्हात शेतात वणवण करत जळणासाठी सरपण मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली. त्याचबरोबर गॅसची सबसिडी बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला चुलीकडे वळत आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५० रुपयांवर पोहोचली असून त्यात अतिरिक्त गाडीभाडे द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या ग्रुप सर्वसामान्य गरिबांना, कष्टकरी महिलांना या सिलिंडर परवडत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पुन्हा चुलीकडे वळलेले दिसून येत आहे. पुन्हा सरपणाचा शोध, उसाची खोडवी, शेणाच्या गोवऱ्या, झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडून त्या रचून ठेवण्यामध्ये महिलावर्ग मग्न आहेत.
किमती आवाक्याबाहेर
१०० रुपयांत उज्ज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला; परंतु सिलिंडरच्या किमती दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूलच बरी अशी भावना गरीब कुटुंबांतील महिलांची झाली आहे.
पैसे नसल्याने सिलिंडर घ्यायचे तरी कसे ?
- उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली, परंतु ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना एकदा संपलेले सिलिंडर पुन्हा घेण्यासाठी पैसेच नसल्याने त्यांना ते रिफिल करता येत नाही.
- त्यातही सबसिडी बंद झाली आहे. त्यामुळे योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे.
- सरपणासाठी महिला जंगलात भटकंती करत असल्याचे चित्र विशेषतः वाडी तांड्यावरील दुर्गम खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे.