'त्या' बेपत्ता तरुणीचा संशयास्पद मृत्यू; सावरगड शिवारात आढळला मृतदेह
By सुरेंद्र राऊत | Updated: September 7, 2022 17:30 IST2022-09-07T17:25:48+5:302022-09-07T17:30:53+5:30
घातपाताचा व्यक्त होतोय संशय

'त्या' बेपत्ता तरुणीचा संशयास्पद मृत्यू; सावरगड शिवारात आढळला मृतदेह
यवतमाळ : येथील घाटंजी मार्गावर असलेल्या सावरगड शिवारात एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता उघड झाली. ग्रामीण पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी शासकीय रुग्णालयात ठेवला. दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्यात २५ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार नोंद होती. यावरून त्या तरुणीची ओळख पटविण्यात आली. मात्र तिची हत्त्या झाली की दुसऱ्या कुठल्या कारणाने मृत्यू झाला हे अजूनही उलगडलेले नाही.
नितू बंडूजी सावध (२५) रा. इंदिरा गांधी वॉर्ड हिंगणघाट जि. वर्धा ह.मु. टिळकवाडी, यवतमाळ असे मृत मुलीचे नाव आहे. ती यवतमाळात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मैत्रिणींसोबत राहात होती. नितू ५ सप्टेंबरला बेपत्ता झाली. याची माहिती मिळाल्यानंतर तिची आई शोभा सावध यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दिली. अवधूतवाडी पोलिसांनी नितूचा शोध सुरू केला. मात्र ती मिळाली नाही. अखेर मंगळवारी रात्री ९.३० वाजता तिचा मृतदेह हाती लागला.
ग्रामीण पोलिसांनी नितूचा मृतदेह शवचिकित्सेसाठी ठेवला आहे. शवचिकित्सा अहवाल प्राप्त झालेला नाही. तिचा मृत्यू नेमका कशाने झाला हे निश्चित झाले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. मात्र पोलीस नितूच्या संपर्कात असलेल्या मुलामुलींची चौकशी करत आहे. नितू ही सावरगड परिसरात कशी गेली, नेमके तिथे काय झाले यासह अनेक प्रश्नांची उकल पोलिसांना करावयाची आहे. घातपाताचा प्रकार उघड झाल्यास आरोपी कोण याचाही शोध घ्यावा लागणार आहे. सध्या तरी अनेक चर्चांना पेव फुटले आहे.