नाल्याच्या पुरातून मृतदेह न्यावा लागतो अंत्यसंस्कारासाठी, माळकिन्ही येथील गंभीर प्रकार
By रवींद्र चांदेकर | Updated: September 8, 2022 20:53 IST2022-09-08T20:44:07+5:302022-09-08T20:53:22+5:30
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही स्मशानभूमी नाही

नाल्याच्या पुरातून मृतदेह न्यावा लागतो अंत्यसंस्कारासाठी, माळकिन्ही येथील गंभीर प्रकार
यवतमाळ : देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे देशातील ग्रामीण भागात चक्क नाल्याच्या पुरातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागतो. महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे भयावह वास्तव बुधवारी उघड झाले.
ग्रामीण भागात कुठे स्मशानभूमी अभावी, तर कुठे दहन शेडअभावी मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. मृत्यू झालेल्या माणसांचा शेवटचा प्रवाससुद्धा खडतर होतो. याचे ताजे उदाहरण तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी दिसून आले. हे गाव भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणून महाराष्ट्रात नावारूपास आले आहे. परंतु, तेथील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाइकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाल्याच्या पुरातून वाट काढावी लागते.
माळकिन्ही येथील अविनाश कलाने (वय ४०) यांचा उपचारांदरम्यान ५ सप्टेंबरला शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला. त्यावेळी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. अंत्यसंस्कार करण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहनशेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाइकांनी ठरविले. परंतु पाऊस थांबता थांबेना. पावसामुळे नाल्याला जोरदार पूर आला होता. नाल्याच्या पैलतीरावर जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होत असल्याने नातेवाइकांनी मृतदेह घेत एकमेकांच्या साहाय्याने छातीपर्यंत पाणी असलेल्या नाल्याच्या पुरातून वाट काढली. मृतदेह पैलतीरावर नेऊन अंत्यसंस्कार केले.
नाल्याच्या पुरातून मृतदेह न्यावा लागतो अंत्यसंस्कारासाठी, माळकिन्ही येथील गंभीर प्रकार#yawatmalpic.twitter.com/WhnPH383ve
— Lokmat (@lokmat) September 8, 2022
लोकप्रतिनिधींविरुद्ध गावकऱ्यांमध्ये रोष
माळकिन्ही हे गाव हिंगोली लोकसभा व उमरखेड विधानसभा क्षेत्रात येते. खासदार हेमंत पाटील व आमदार नामदेव ससाणे हे दोन्ही लोकप्रतिनिधी गावकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाल्याकाठी अंत्यविधी करावा लागतो. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र, अद्याप सुविधा उपल्बध झाली नाही.
गजानन काळे,
उपसरपंच, माळकिन्ही
स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली. मात्र, मागणी अद्याप धूळ खात आहे.
शीतल लहाने, सरपंच, माळकिन्ही