ठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना चोप देता का हो ?
By Admin | Updated: January 10, 2015 02:09 IST2015-01-10T02:09:49+5:302015-01-10T02:09:49+5:30
ठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना खरच चोप देता का ? ‘बाजीराव काय असते बरं’? गुंड-गुन्हेगारांना पकडताना तुम्हाला भीती वाटत नाही का ? काका तुम्ही कोणताच सण-उत्सव साजरा करीत नाही का ?

ठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना चोप देता का हो ?
सुनील हिरास दिग्रस
ठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना खरच चोप देता का ? ‘बाजीराव काय असते बरं’? गुंड-गुन्हेगारांना पकडताना तुम्हाला भीती वाटत नाही का ? काका तुम्ही कोणताच सण-उत्सव साजरा करीत नाही का ? तुमची मुलं, तुमच्या मागे लागत नाही का? असे एक ना अनेक प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांनी पोलिसांना भंडावून सोडले.
दिग्रस येथील अंजुमन उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून चक्क पोलिसांचीच दांडी उडविली. मात्र पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक प्रकाश राऊत, वनदेव कापडे आदींनी चेहऱ्यावर हास्य फुलवित तेवढ्याच संयमाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. काका तुम्ही कोणता सण-उत्सव साजरा करताना दिसत नाही. मग तुमची मुलं-बाळ यात्रा, उत्सवात घेऊन जाण्याचा हट्ट धरत नाही का असा प्रश्न केला. तेव्हा ठाण्यातील वातावरण धीरगंभीर झाले. तुमच्या सारखे चिमुकले उद्याचे आदर्श नागरिक बनतील, गुन्हेगारी कमी होईल, तेव्हा आम्ही सण-उत्सव साजरा करू असे उत्तर पोलिसांनी दिले.
रायझिंग डे निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी एजाजोद्दीन होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष हगवणे, शेख मोहसीन, शैलेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश दंदे, दीपक कांकेटवार, पवन गोरे, गजानन पत्रे, संदीप ठाकूर, प्राचार्य मकसुद अहमद, हसीम खान, गाजी देशमुख, मसूद खान, मोहंमद हारुण, सुफी देशमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याचा कसा कारभार चालतो हे जवळून अनुभवले. यावेळी नोंदणी कक्ष, ठाणेदाराचा कक्ष, बिनतारी संदेश विभाग, गोपनीय अहवाल, लॉकअप, गुन्हे विभाग आदींची विस्तृत माहिती घेतली. यावेळी थ्री नॉट थ्री, एसएलआर, गॅस गन, अश्रुधुरांच्या नळकांड्या, ढाली, गोळ्या, पिस्तुल आदी विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिल्या. ही शस्त्रे विद्यार्थ्यांनी हातून घेऊन निरीक्षण केले. यावेळी अंमलदार शरद येडतकर, नारायण पवार, शेख मोहसीन उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी हात मिळवून ठाणेदारांचे अॅटोग्राफ घेतले. विद्यार्थी बराच वेळ पोलीस ठाण्याच्या आवारात रमले. जणू आपल्या शाळेचा वर्गच सुरू आहे की काय अशा आवेशात आणि कुतुहलाने विद्यार्थी पोलीस ठाण्यात वावरताना दिसत होते. सर्वांचे चेहरे हास्याने प्रफुल्लित झाले होते. तर आपण आज पोलीस ठाणे पाहून जग जिंकू२२न टाकले या अविरभावात पोलीस ठाण्याचा निरोप घेतला. कार्यक्रमाला मजहर अहमद खान, सुहेल जावेद यांच्यासह अंजुमन उर्दू विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.