अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

By Admin | Updated: July 29, 2016 02:22 IST2016-07-29T02:22:43+5:302016-07-29T02:22:43+5:30

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे गुरूवारी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा नेण्यात आला.

Thalnad of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

जिल्हा परिषेदसमोर आंदोलन : २ सप्टेंबरपासून राज्यव्यापी जेलभरो
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे गुरूवारी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा नेण्यात आला. मोर्चात सहभागी अंगणवाडी तार्इंनी थाळीनाद करून जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन निश्चित करण्यासाठी त्वरित समिती गठित करणे, सेवेच्या प्रमाणात लाभ देणे, दरवर्षी मिळणाऱ्या बोनस व भाऊबिज भेटीत वाढ करणे, आदी समस्या सोडविण्याची ग्वाही गेल्या फेब्रुवारीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संघटनेला दिली होती. मात्र अद्याप मागण्या पूर्ण झाल्या नाही. तसेच सेवानिवृत्ती लाभ वाढविण्याचा प्रस्ताव अद्याप तयार झाला नाही.
शासन स्तरावर निर्णय घेतला जात नसल्याने, तसेच शासनाच्या अकार्यक्षमतेचा, दिरंगाईचा व वेळकाढूपणाबद्दल संताप व्यक्त करीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले. यावेळी त्यांनी मानधन वेळेवर द्यावे, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वेळीच द्यावे, सेवासमाप्ती लाभाची रक्कम तातडीने द्यावी, बालवाडी व अंगणवाडी समानीकरण, आदी मागण्या केल्या. त्याचप्रमाणे एकात्मिक बालविकास योजनेच्या अंदाजपत्रकात कपात केल्याचा निषेध केला.
आंदोलनाचे नेतृत्व मंगला सराफ यांनी केले. त्यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चेअंती सर्व मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यानंतर थाळीनाद आंदोलन मागे घेण्यात आले.
मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २ सप्टेंबरपासून राज्यात राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे देण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Thalnad of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.