दिग्रसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर
By Admin | Updated: October 11, 2014 02:19 IST2014-10-11T02:19:56+5:302014-10-11T02:19:56+5:30
सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे.

दिग्रसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत काट्याची टक्कर
सुरुवातीला शिवसेनेकडून विक्रमी मताधिक्याचे अंदाज वर्तविण्यात आलेल्या दिग्रस मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने कडवे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.
या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व काँग्रेस या चार प्रमुख पक्षात स्पर्धात आहे. जातीय समीकरण व मतविभाजन यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. ज्या उमेदवाराला या फॅक्टरचा फायदा होईल त्याचा विजय निश्चित मानला जात आहे.
मतदारसंघाच्या फेररचनेपूर्वी जुन्या दारव्हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. १९६७ आणि १९७८ या दोन टर्मची निवडणूक सोडली तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. माणिकराव ठाकरे यांनी सलग २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला. नंतर या मतदारसंघाची फेररचना झाली. दिग्रस, दारव्हा, नेर हे तालुके मिळून दिग्रस मतदारसंघ झाला. २००९ मध्ये संजय देशमुख यांचा संजय राठोड यांनी पराभव केला, दोनही टर्ममध्ये सत्ता नसूनही स्थानिक विकास निधी व अन्य निधी राठोड यांनी खेचून आणला. चांगला जनसंपर्क हा त्यांचा प्लस पॉर्इंट समजला जातो. गेल्या दहा वर्षात या भागात आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेचे चांगले नेटवर्क तयार केले. त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होताना दिसतो आहे. या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी फार पूर्वीपासून तयारी केली होती. आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यावर होता. परंतु गृहमतदारसंघ असतानासुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे पूत्र राहुल ठाकरे हे या ठिकाणी लढण्यास उत्सुक नव्हते. प्रमुख नेत्यांच्या अशा या भूमिकेमुळे या मतदारसंघात निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सुरुवातीला होते. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडी आणि महायुती तुटली. भाजपने प्रा.अजय दुबे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने दुसऱ्या फळीतील देवानंद पवार यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने वसंत घुईखेडकर यांना संधी दिली. या मतदारसंघावर बंजारा व कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. परंतु गेल्या दोनही निवडणुकीत कुणबी-मराठा उमेदवार असतानाही संजय राठोड यांना बंजारासह कुणबी व इतर मतांचा पाठिंबा मिळाला होता. पण यावेळी राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर आव्हान उभे केले. निवेदने, बॅनर, पोस्टर रॅली, कॉर्नर सभा, डोअर टू डोअर प्रचार यावर भर दिला जात आहे शिवसेनेला मोठ्या सभांची प्रतीक्षा आहे. राष्ट्रवादीने अजित पवार, खासदार तारीक अन्वर, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या सभा घेतल्या. उर्वरित दोन प्रमुख उमेदवारही चांगला जोर लावून आहे. भाजपाचे प्रा.अजय दुबे गावागावात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.